मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत ही सेलिब्रिटी असली आणि तिच्या हातात कामे असली तरी ती या प्रकरणात आरोपी आहे, हे ती विसरू शकत नाही, असे म्हणत अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर मानहानी दाव्याच्या खटल्यात कंगनाला कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची सवलत देण्यास नकार दिला. कंगना रनौत हिने खटल्यास कायमच अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. त्यासाठी तिने कामाचे कारण पुढे केले होते. मंगळवारी न्या. आर. आर. खान यांनी तिचा हा अर्ज फेटाळला. मात्र, गुरुवारी आदेशाची प्रत उपलब्ध झाली. आरोपी खटल्याच्या सुनावणीसाठी स्वत:च्या अटी ठरवीत आहे. आरोपी त्याचा हक्क म्हणून खटल्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याची कायमची सवलत मागू शकत नाही. आरोपीचा जामीन मंजूर करताना कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रिया आणि अटी व शर्तींचे पालन करावे लागेल, असे न्या. खान यांनी आदेशात म्हटले आहे. न्यायालयाला सहकार्य करण्याच्या हेतूने आतापर्यंत आरोपी न्यायालयात उपस्थित राहिली नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.नोेव्हेंबर २०२० मध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रनौत हिच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्यावर आरोप केले. माझी समाजातील प्रतिष्ठा धुळीला मिळविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अख्तर यांनी केला आहे.कंगनाने खटल्यास कायमचे अनुपस्थित राहण्यासाठी केलेल्या अर्जात म्हटले आहे की, ती हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री असून, तिला देशांतर्गत व परदेशातील वेगवेगळया भागात चित्रीकरणासाठी जावे लागते. कंगनाच्या या अर्जाला जावेद अख्तर यांच्या वकिलांनीही विरोध केला होता.न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळताना म्हटले की, आरोपी एक सेलिब्रिटी असल्याने तिला काही कामे आहेत, यात शंका नाही. परंतु, या प्रकरणात ती एक आरोपी आहे, हे तिने विसरू नये. तिचे सहकार्य आवश्यक आहे. आरोपीला खटल्यास अनुपस्थित राहण्याची मुभा दिली तर खटला पुढे सरकरणार नाही.
जावेद अख्तर मानहानी दावा प्रकरण: कंगना रनौत सेलिब्रिटी असली तरी आरोपी- कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 7:28 AM