कंगना रनौत हा विषय आमच्या दृष्टीने तरी संपला; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 01:18 AM2020-09-11T01:18:29+5:302020-09-11T06:32:52+5:30
शिवसेनेने कंगनासोबत संघर्षाचा पवित्रा घेतल्याने विनाकारण वादंग निर्माण होत असल्याची भावना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त झाली.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणे सोडून दिले आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी कंगनाबाबत कोणतेच भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. शिवसेनेने कंगनासोबत संघर्षाचा पवित्रा घेतल्याने विनाकारण वादंग निर्माण होत असल्याची भावना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून व्यक्त झाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सूचकपणे सबुरीचा सल्ला दिला. या साऱ्या घडामोडीनंतर शिवसेनेने या प्रकरणी आता कोणतेच विधान करायचे नाही, अथवा जाहीर भूमिका घ्यायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. कंगनाने मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली असतानाही संजय राऊत यांनी यावर बोलण्यास नकार दिला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज असल्याची अफवा माध्यमांनी पसरवू नये, असे काहीही घडलेले नाही. कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही ते विसरुन गेलो. ती काय टिष्ट्वट करते, ते वाचले नाही. आम्ही फक्त सामना वाचतो, असे संजय राऊत यांनी याबाबत विचारले असता स्पष्ट केले.
काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांना न बोलण्याच्या सूचना
कंगना रनौतप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी अथवा प्रवक्त्यांनी कोणतेही विधान करू नये. कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या फंदात पडू नये. यासंदर्भातील वाहिन्यांवरील चर्चेतही जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या आहेत. स्वत: पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीच या प्रकरणी काँग्रेस नेत्यांना न बोलण्याचे फर्मावल्याची चर्चा प्रदेश नेत्यांमध्ये होती. विशेषत: वाहिन्यांवरील चर्चेत अथवा माध्यमांशी बोलणाºया नेत्यांनी हायकमांडच्या सूचनेनंतर मौन बाळगणे पसंद केले.