मुंबई – वाय दर्जाच्या सुरक्षेसह अभिनेत्री कंगना राणौत आज चंदीगड एअरपोर्टहून मुंबईला येणार आहे. दुपारी १२.३० वाजता ती चंढिगडहून मुंबईसाठी रवाना होईल. सध्या ती हिमाचल प्रदेशातील मंडी येथील तिच्या घरी आहे. मंगळवारी कंगना तिच्या मूळगावी पोहचली त्याठिकाणी तिच्या चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केली होती. तिच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षाही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे.
मंगळवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनावरील ड्रग्स घेण्याचा आरोपाचा तपास करेल असं म्हटलं होतं. तर शिवसेनेने कंगनाविरोधात ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंगना राणौतविरोधात तपास करण्यासाठी सरकारने अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनच्या मुलाखतीचा हवाला दिला आहे. अध्ययनने कंगना ड्रग्स घेत होती आणि मलाही ड्रग्स घेण्यासाठी फोर्स करायची असं म्हटलं होतं. गृहमंत्र्यांनी या विधानाचा हवाला देत कंगनाची चौकशी करणार असल्याचं सांगितले.
कंगनाने महाराष्ट्र सरकारला दिलं उत्तर
मी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या उपकारामुळे खूप खूश आहे. कृपया माझी टेस्ट करा. माझे कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग पेडलरसोबत माझी कोणती लिंक मिळाली तर मी माझी चूक स्वीकारेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुम्हाला भेटण्याची वाट पाहत आहे अशा शब्दात कंगनाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना चॅलेंज दिलं आहे.
कंगनाच्या कार्यालयाला मुंबई महापालिकेची नोटीस
कंगनाने २०१७ मध्ये पाली हिल येथे तीन हजार चौरस फुटांची जागा खरेदी केली. जानेवारी २०२० मध्ये तिने या ठिकाणी मनिकर्णिका फिल्म नावाने कार्यालय थाटले. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत त्यांना कंगनाच्या कार्यालयात १४ नियमबाह्य कामे दिसून आली आहेत. त्यानुसार पालिकेने तिला या कार्यालयाच्या बांधकामासंबंधी कागदपत्रे उद्यापर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या संदर्भातही कंगनाने तिच्या वकीलांमार्फत बीएमसीला उत्तर दिले आहे.
कंगना राणौतचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह
अभिनेत्री कंगना राणौत मुंबईत येणार असल्याने तिने मनाली येथे कोरोनाची टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती मंडी येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. देवेंदर शर्मा यांनी दिली आहे.
कंगनाला हात लावाल तर याद राखा
हिमाचल प्रदेशातील करणी सेनेने शिवसेनेला इशारा दिला आहे. करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष पीयूष चंदेल यांनी सांगितले आहे की, कंगना राणौत ही हिमाचल प्रदेशाची शान आहे. एकट्या कंगनानं बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांचा पर्दाफाश केला आहे. सुशांत सिंग प्रकरणातही कंगनाने इतक्या जिद्दीने पुढे आली त्यामुळेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असं ते म्हणाले. ड्रग्स प्रकरणात अनेक मोठे लोक यात अडकण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा निषेध करतो. जर हिमाचल प्रदेशच्या मुलीला हात लावला तर शिवसेनेने महाराष्ट्रात करणी सेनेशी मुकाबला करण्यासाठी तयार राहावं. जर कंगनाला हवं असेल तर करणी सेना तिच्या लढाईत तिच्या खांद्याला खांदा मिळवून काम करायला तयार आहे. कंगना राणौत ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी करणी सेनेचे कार्यकर्ते एअरपोर्टपासून तिच्या घरापर्यंत तिचं संरक्षण करतील असंही पीयूष चंदेल यांनी सांगितले आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा
मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.