कंगना रनौतला उपरती; आता म्हणते, जय मुंबई, जय महाराष्ट्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:34 AM2020-09-06T02:34:41+5:302020-09-06T07:01:43+5:30
तालिबानशी मुंबईची तुलना केल्यानंतर राज्यभरातील जनतेत संताप,
मुंबई : महाराष्ट्रची राजधानी मुंबईचे वर्णन पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला शनिवारी उपरती झाली व तिने जय मुंबई, जय महाराष्ट्र, असा नारा दिला. एवढेच नव्हे, तर मुंबईने मला यशोदामातेप्रमाणे जपले, असेही म्हटले आहे.
मुंबई शहर व मुंबई पोलिसांचा अपमान करणाºया कंगनाने असे अचानक घुमजाव का केले, हे समजू शकलेले नाही. पण तिच्याविरोधात महाराष्ट्रात उमटलेली लाट आणि स्वत:ची हिंदी चित्रपटातील करिअर यामुळे तिने माघार घेतली असावी, अशी चर्चा आहे. केवळ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्ताधारी पक्षच नव्हे, तर मनसेनेही तिच्यावर कडक शब्दांत टीका केली आणि बराच काल तिची बाजू घेणाºया भाजपनेही तिचे समर्थन न करण्याचा निर्णय घेतला. सर्व राजकीय पक्षांबरोबरच मराठी लोकही संतापले. ती मराठी अस्मितेचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान करीत आहे, असे लोकांना वाटले.
याशिवाय बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही तिची स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली, तर नेटिझन्सनी सोशल मीडियातून तिच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केले. त्यातूनच आपली वक्तव्ये अडचणीत आणत आहेत, असे वाटल्यामुळे, तिने जय मुंबई आणि जय महाराष्ट्र, असा नारा ट्विट करून दिला, असावा, असे बोलले जात आहे. मुंबईचे वर्णन तिने योशोदामातेशी करून, आपण आधीची वक्तव्ये मागे घेत असल्याचे सूचित केले आहे, असे बॉलिवूडमधील मंडळींना वाटत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत टिकायचे, तर मुंबईखेरीज पर्याय नाही, याची तिला जाणीव झाली असावी, असे पालकांना वाटत आहे.
अनेक दावेही ठरले खोटे
बॉलीवूडला मराठा अभिमान नाही आणि मुस्लिम प्रभाव हे त्याचे कारण आहे, असे वादग्रस्त विधान करून तिने झाशीच्या राणीवर चित्रपट सर्वात आधी आपण केला, असे म्हटले होते. पण झाशीच्या राणीवर आधीच दोन हिंदी चित्रपट आले होते. त्यापैकी एक सोहराब मोदी यांनी १९५३ साली तयार केला. त्यात राणीची भूमिका मेहताब या मुस्लिम अभिनेत्रीने केली होती. याशिवाय शिवाजी महाराज, तानाजी, संभाजी महाराज यांच्यावर हिंदी तसेच मराठीत अनेक चित्रपट आले आहेत आणि टीव्ही मालिकाही तयार झाल्या आहेत. त्यामुळे मराठी अभिमानाचा तिचा मुद्दा आणि दावाही खोटा ठरला आहे.