कंगनाच्या याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध; मानहानीचा दावा रद्द करण्याला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 07:33 AM2021-08-10T07:33:55+5:302021-08-10T07:34:14+5:30
कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
मुंबई : जावेद अख्तर यांनी तक्रार केल्यानंतर अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली कार्यवाही रद्द करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आक्षेप घेत अख्तर यांनी ही याचिका फेटाळण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली.
कंगनाविरुद्ध फौजदारी कार्यवाही करताना दंडाधिकारी न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, असे जावेद अख्तर यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दंडाधिकाऱ्यांनी तक्रारदाराची स्वतंत्रपणे चौकशी केली नाही किंवा साक्षीदारांची नावेही तपासली नाहीत. जुहू पोलिसांच्या अहवालावरून दंडाधिकाऱ्यांनी कार्यवाही केली, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे.
दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारातच राहून कार्यवाही केली आहे. शपथेवर लिहून दिलेला जबाब वाचला, त्यात कंगनाविरोधात असलेल्या सर्व तक्रारी नमूद करण्यात आल्या आहेत, असे जावेद अख्तर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगनाने आपली बदनामी केली व वाट्टेल तसे तथ्यहीन आरोप केले, असे जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात केलेल्या मानहानी दाव्यात म्हटले आहे.
डिसेंबर महिन्यात न्यायदंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार, प्रथमदर्शनी अख्तर यांनी केलेल्या आरोपांत तथ्य आहे. मात्र, आणखी तपास आवश्यक आहे. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करीत कंगनाला फेब्रुवारी २०२१ मध्ये समन्स बजावले.
अर्जदाराने (कंगना) १९ जुलै २०२० रोजी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा फुटेज पाहून आणि जबाबाची पूर्ण छाननी करूनच दंडाधिकाऱ्यांनी अर्जदाराला समन्स बजावले, असे अख्तर यांनी न्यायालयाला सांगितले.
या याचिकेवरील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालय घेण्याची शक्यता आहे.