मनोहर कुंभेजकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने खार पश्चिम, पाली हिल येथील डी. बी. ब्रिझ इमारतीत २०१४ साली सदनिका घेतली. तिने घरगुती सदनिकेत अनधिकृत बांधकाम आत घेऊन त्याचे निवासी घरात रूपांतर केले. या अनधिकृत बांधकामामुळे पालिकेने २०१८ साली तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. मात्र तिने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याऐवजी ते वाचविण्यासाठी दिवाणी न्यायालयात धाव घेतली. २००० चौरस फुटांची घेतलेली जागा आणि फ्री अॉफ एफएसआय मिळालेल्या चटई क्षेत्राच्या जागेचा निवासी वापर करीत तिने महापालिका व राज्य शासनाचा १२ कोटींचा महसूल बुडविल्याची माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
अनधिकृत बांधकाम करून कंगना रनौतने एमआरटीपी कायदा व महापालिका कायदा १८८८ चे उल्लंघन केल्याचे या अधिकाºयाने सांगितले. पालिकेने केलेल्या तोडक कारवाईविरोधात तिने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी आहे.
९ सप्टेंबर रोजी कंगनाच्या पाली हिल, वांद्रे, पश्चिम येथील कार्यालयावर केलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा मारला. कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही कारवाई करण्यास पालिकेला मनाई करीत न्यायालयाने स्थगिती दिली. मात्र ९ सप्टेंबरला या प्रकरणी जेव्हा कंगनाने न्यायालयात दावा दाखल केला तेव्हा ती मुंबईत नव्हती, याचिकेवर तिची सही नव्हती. कोर्टाच्या रजिस्टारसमोर तिने व्हेरिफिकेशनही केले नव्हते; शिवाय तिने वकालतनामाही सादर केला नव्हता, अशी धक्कादायक माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.