खारमधील फ्लॅट : बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी अर्ज करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स या अवैधरीत्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधातील याचिका अभिनेत्री कंगना रनौतने अखेर बुधवारी मागे घेतली. या फ्लॅट्समधील बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी पालिकेकडे रीतसर अर्ज करू, अशी माहिती कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.
कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय तिच्या विरोधात असल्यास त्या अनुषंगाने पालिकेने दोन आठवड्यांपर्यंत कार्यवाही करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने पालिकेला दिले.
खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्सचे अवैधरीत्या एकत्रीकरण करून कंगनाने त्यात बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी पालिकेने तिला २०१८ मध्ये कायदेशीर नोटीस बजावली. या नोटीसला कंगनाने दिवाणी न्यायालयात आव्हान दिले. डिसेंबर २०२० मध्ये दिवाणी न्यायालयाने पालिकेने बजावलेली नोटीस योग्य ठरवत कंगनाला दिलासा देण्यास नकार दिला. या निर्णयाला कंगनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. बुधवारी या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी हाेती.
पालिका कंगनाशी वैर बाळगून आहे. हे बेकायदेशीर बांधकाम तिने केले नसून, विकासकाने केले आहे, असा युक्तिवाद कंगनातर्फे ज्येष्ठ वकील वीरेंद्र सराफ यांनी न्यायालयात केला, तर पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय व जोएल कार्लोस यांनी न्यायालयाला सांगितले की, संबंधित फ्लॅटमध्ये आठ ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले आहे.
* ...ताेपर्यंत कठाेर कारवाई न करण्याचे निर्देश
न्यायालयाने कंगनाला पालिकेविरोधातील याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. तसेच बांधकाम नियमित करण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या अर्जावर चार आठवड्यांत निर्णय घ्या, तोपर्यंत त्यावर कठोर कारवाई करू नका, असेही न्यायालयाने पालिकेला बजावले.
--------------------