कंगना देशद्रोह प्रकरण; पोलिसांनी न्यायालयात सादर केला तपास अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 06:59 AM2021-03-05T06:59:49+5:302021-03-05T07:00:13+5:30
कंगना व रंगोलीविरोधात व्यवसायाने वकील असलेल्या अली खाशीफ खान देशमुख यांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी करून ५ डिसेंबर रोजी अहवाल सादर करा, असे निर्देश दंडाधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०२० रोजी आंबोली पोलिसांना दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंदेल या समाजमाध्यमांवर द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट टाकतात, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांसंदर्भात चौकशी करून मुंबई पोलिसांनी गुरुवारी दंडाधिकारी न्यायालयात अहवाल सादर केला.
कंगना व रंगोलीविरोधात व्यवसायाने वकील असलेल्या अली खाशीफ खान देशमुख यांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी करून ५ डिसेंबर रोजी अहवाल सादर करा, असे निर्देश दंडाधिकाऱ्यांनी ऑक्टोबर २०२० रोजी आंबोली पोलिसांना दिले होते. मात्र, या मुदतीत तपास अहवाल सादर करण्यात पोलीस अपयशी ठरले. त्यानंतर वाढवून दिलेल्या मुदतीतही पोलीस तपास अहवाल सादर करू शकले नाहीत. अखेर ५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने पोलिसांना तपास प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देत गुरुवार ४ मार्च रोजी सुनावणी ठेवली हाेती. त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीत पोलिसांनी तपास प्रगती अहवाल न्यायालयात सादर केला. न्यायालयाने आदेश देण्यासाठी या याचिकेवरील सुनावणी ५ एप्रिल रोजी ठेवली.
तक्रारीनुसार, कंगनाची बहीण रंगोलीने गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात एका समाजाला उद्देशून ट्वीट केले. त्यामुळे ट्विटरने तिचे अकाउंट बंद केले. त्यानंतर कंगनाने तिच्या बहिणीच्या समर्थनार्थ एका समुदायाच्या लोकांच्या व्हिडिओ क्लिप पोस्ट करून ते दहशतवादी असल्याचे म्हटले. या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोघींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी याचिककर्त्यांनी केली आहे.