कंगना vs राऊत सामन्यात 'मुंबादेवी' ट्रेंडिंगमध्ये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 04:50 PM2020-09-07T16:50:46+5:302020-09-07T16:51:34+5:30
जे लोक अशाप्रकारे शिवसेनेवर आरोप करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते मुंबई आणि मुंबादेवीचा अपमान करत आहेत. शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. कंगना राणौतला अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली. कंगना जे मुंबईबद्दल बोलली ते चुकीचेच आहे परंतु एका महिलेबाबत अर्वाच्च भाषेचा वापर करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही असं सांगत अनेकांनी संजय राऊतांच्या भूमिकेचा विरोध केला होता. त्यानंतर, आता राऊत यांच्या मुंबा देवीसंदर्भातील ट्विट वरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. देवीला मानायचं, आणि महिलांचा अपमान करायचा, हे योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलंय.
जे लोक अशाप्रकारे शिवसेनेवर आरोप करत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ते मुंबई आणि मुंबादेवीचा अपमान करत आहेत. शिवसेना नेहमीच महिलांच्या हक्कासाठी यापुढेही संघर्ष करेल. शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर, मुंबा देवी हा ट्विटर ट्रेंड करत आहे. ट्विटरवरुन अनेकांनी संजय राऊत यांना मुंबा देवीचा आधार घेऊन सहानुभूतीचा खेळत खेळत असल्याचं म्हटलंय. तसेच, अनेकांनी मिम्सही बनवले आहेत.
मुंबा देवीचा या प्रकरणाशी काय संबंध? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. मुंबा देवाीच्या नावानं राजकारण करु नका, असेही ट्विटर युजर्संने राऊत यांना म्हटलंय. त्यामुळे, कंगना राणौत प्रकरणात मुंबा देवाची संदर्भ देत राऊत यांनी पुन्हा वाद ओढावून घेतला आहे.
मुंबा देवीच्या नावारुनच मुंबई
मुंबई या शहाराला मुंबा देवीच्या नावावरुनच मुंबई हे नाव मिळालं आहे. मुंबईला लक्ष्मी मातेचं रुप मानलं जातं. त्यामुळेच, मुंबईला माता लक्ष्मीचं घरही म्हणतात. समुद्रात येणाऱ्या प्रत्येक अडचणींपासून मुंबा देवी मच्छिमारांचे रक्षण करते. त्यामुळेच, प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला मुंबा देवीची पूजा केली जाते. मुंबा देवीचं वाहन दररोज बदललं जातं, हे मुंबा देवीचं वैशिष्ट्य आहे. सन 1737 मध्ये मूळ मेंजिस याठिकाणी हे मंदिर उभारण्यात आले होते. सध्या तेथे व्हिक्टोरिया टर्मिनस बिल्डींग आहे.
काय म्हणाली होती कंगना राणौत?
संजयजी तुम्ही माझ्याबद्दल अपशब्द वापरले..तुम्ही एक नेते आहात आणि हे तुम्हाला माहितच असेल की या देशात तासाला अनेक महिलांवर बलात्कार होत आहे, त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे, अॅसिड हल्ला केला जातोय. तुम्हाला माहित्येय याला जबाबदार कोण आहे? तुम्ही माझ्याप्रती अपशब्द वापरून जी मानसिकता दर्शवलीत, ही त्याला जबाबदार आहे. या देशातील मुलगी तुम्हाला कधीच माफ करणार नाही,' असे तिनं म्हटलं होतं.
आमीर खान, नसरुद्दीन त्यांना कुणीच काही म्हटलं नाही.
''या देशात राहण्याची भीती वाटते, असं जेव्हा आमीर खान म्हटला होता. त्यावेळी कुणीच असे अपशब्द वापरले नाहीत. नसरुद्दीन शाह यांनाही कुणीच प्रत्युत्तर दिलं नाही. मुंबई पोलिसांचे मी कौतुक करताना थकत नव्हती. पण, पालघर साधू हत्या असेल किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल त्यावरून मी त्यांच्यावर टीका केली, तर ती माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,असंही ती म्हणाली.
संजय निरुपमांची शिवसेनेवर टीका
कंगना राणौतनं मुंबईबद्दल जे भाष्य केले आहे ते आम्हा कोणालाच मान्य नाही. तिच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला. पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कंगनावर अर्वाच्च भाषेचा वापर केला. ही शिवसेनेची निराशा आहे. छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणे हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशी मागणी संजय निरुपम यांनी केली होती.
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.