कंगनाचा मुंबई महापालिकेवर दोन कोटींचा दावा, उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 06:12 AM2020-09-16T06:12:15+5:302020-09-16T06:12:49+5:30
उच्च न्यायालयाने कारवाईवर स्थगिती देत कंगनाला याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
मुंबई : मुंबई महापालिकेने बेकायदेशीररीत्या बंगल्यावर कारवाई केल्याचा आरोप करीत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने पालिकेकडून दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. त्यासाठी तिने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते, त्यावर पालिकेने ९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. त्यानंतर लगेचच कंगनाने या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने कारवाईवर स्थगिती देत कंगनाला याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
पालिकेने हेतुपूर्वक कारवाई केल्याचे निरीक्षण न्यायालयाने स्थगिती देताना नोंदविले होते. कंगनाने सुधारित याचिकेत म्हटले आहे की, राज्य सरकारवर टीका केल्याने आपल्या बंगल्यावर कारवाई करण्यात आली. काही बाबी हाताळण्यासंदर्भात सरकारवर टीका केल्याने थेट आपल्या बंगल्यावरच कारवाई करण्यात आली. मुंबईत न येण्याची धमकीही मला देण्यात आली. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी मला वाय प्लस सुरक्षा घेण्यास भाग पाडण्यात आले. केंद्र सरकारने दिलेल्या या सुरक्षेमुळेच मी मुंबईत येऊ शकले. जो राजकीय पक्ष सरकारचा एक भाग आहे, त्याच राजकीय पक्षाची पालिकेवर सत्ता आहे, असे कंगनाने शिवसेनेचे नाव न घेता याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी आहे.
बंगल्याची दुरुस्ती करण्यासाठी २०१८ मध्ये पालिकेकडून परवानगी मगितली होती आणि पालिकेने परवानगी दिली होती. ७ सप्टेंबर रोजी पालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत कंगनाला २४ तासांची नोटीस बजावली. याबाबत स्पष्टीकरण देऊनही पालिकेने तत्काळ ते फेटाळले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी बंगल्याबाहेर पोलीस व पालिका अधिकारी कारवाई करण्यास हजर झाले. यावरून ही कारवाई हेतुपूर्वक असल्याचे समजते, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे.