कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 01:29 AM2020-09-11T01:29:55+5:302020-09-11T06:30:38+5:30

कंगनाचे महाराष्ट्राबद्दल गौरवोद्गार

Kangana's fire, while Shiv Sena's silence; Action support from NCP | कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन

कंगनाची आगपाखड, तर शिवसेनेचे मौन; मनपाकडून कारवाईचे समर्थन

Next

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई महापालिका आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आगपाखड केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारधारेवर शिवसेना उभी केली, तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे, अशा शब्दांत कंगनाने शाब्दिक फटकारे लगावले. मात्र त्याला शिवसेनेकडून तिला काहीच प्रत्युत्तर देण्यात आले नाही. तर दुसरीकडे, कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचे मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात समर्थन केले. न्यायालयाने पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी ठेवली.

एका ट्विटला उत्तर देताना बाळासाहेबांच्या शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचा आरोप तिने केला. शिवाय, ज्या गुंडांनी माझ्या अनुपस्थितीत माझे घर तोडले त्यांना पालिका प्रशासन म्हणून संविधानाचा अपमान करू नका, असेही ती म्हणाली. वडिलांच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला संपत्ती तर मिळू शकते. मात्र, सन्मान स्वत:लाच कमवावा लागतो. माझे तोंड तुम्ही बंद कराल; पण माझा आवाज लाखो लोकांमध्ये उमटत राहील. किती तोंडे बंद कराल? किती आवाज दाबाल? कुठवर सत्यापासून पळ काढाल? तुम्ही केवळ घराणेशाहीचे एक प्रतीक आहात आणखी काहीच नाही, अशी बोचरी टीका कंगनाने केली.

महाराष्ट्राबद्दल गौरवोद्गार

एकीकडे शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवितानाच कंगनाने महाराष्ट्राबद्दल गौरवोद्गारही काढले. महाराष्ट्रातील लोकसुद्धा सरकारने केलेल्या गुंडगिरीचा निषेध करत आहेत. माझ्या अनेक मराठी शुभचिंतकांचे मला फोन आले. जगभरातील विशेषत: विशेषत: हिमाचल प्रदेशातील जे लोक दुखीकष्टी झाले आहेत त्यांनी अजिबात असे समजू नये की मला महाराष्ट्रात प्रेम आणि सन्मान मिळत नाहीये. महाराष्ट्र सरकारच्या का काळ्या कृत्यामुळे जगात मराठी संस्कृती आणि गौरवाला धक्का लागता कामा नये, असे सांगत 'जय महाराष्ट्र' म्हणणारे टिष्ट्वट कंगनाने केले.

काँग्रेसनेही राखले अंतर

कंगना रनौतप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी अथवा प्रवक्त्यांनी कोणतेही विधान करू नये. कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या फंदात पडू नये. यासंदर्भातील वाहिन्यांवरील चर्चेतही जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्या असल्याचे समजते

हा विषय संपला. आम्ही याबाबत चर्चा करणे सोडले आहे, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी भाष्य करण्यास नकार दिला. कंगना प्रश्नी काहीही बोलायचे नाही, असा निर्णय सेनेने घेतला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. सोनिया गांधी, शरद पवार नाराज असल्याची अफवा माध्यमांनी पसरवू नये, असे घडलेले नाही. ती काय ट्वीट करतेय, ते वाचले नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

कंगनाच्या आरोपावर शरद पवारांना आले हसू!

कंगनाने केलेल्या आरोपाविषयी विचारले असता खा. शरद पवार हसत हसत म्हणाले, माझ्या नावावर अशी एखादी बिल्डिंंग असावी अशी माझीपण इच्छा आहे. अर्थात, जे कोणी सध्या बोलत आहेत त्यांच्याकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का?

रामदास आठवलेंनी केली पाठराखण

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कंगना रानौत हिची तिच्या घरी भेट घेऊन तिला पाठिंबा दर्शविला. कंगनावर अन्याय झाला असून, आम्ही तिच्या पाठीशी आहोत. मुंबई सगळ्यांची आहे. इथे राहण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, असे आठवले यांनी सांगितले.
 

Web Title: Kangana's fire, while Shiv Sena's silence; Action support from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.