'कंगनाचं ते विधान, देशात सुनियोजीतपणे गांधी, नेहरुंचं चरित्रहनन करण्याचं काम'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 11:55 AM2021-11-17T11:55:21+5:302021-11-17T12:02:10+5:30
नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे
मुंबई - एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत. पण, त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले. तसेच, कंगनाचे ते विधान म्हणजे नियोजितपणे गांधी, नेहरु आणि स्वातंत्र्य सैनिकांचे चरित्रहनन करण्याचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
नियोजन पध्दतीने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम आधीपासूनच सुरू आहे. खोटा इतिहास सांगणे, खोटी माहिती उपलब्ध करून देणे अशा पध्दतीने वारंवार असे लोकं बोलत आहेत, असेही मलिक म्हणाले.
कंगना राणावत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले आहे. अहिंसा हे विचार जगाने स्वीकारले आहेत. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो मात्र तिने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण आहे हे देशाला माहीत आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. ज्या लोकांनी बापूंची हत्या केली तेपण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे असे स्पष्टपणे नवाब मलिक यांनी सांगितले.