Join us

अनिच्छेने शिवसेनेला मतदान करावे लागल्याचे कंगनाचे विधान चुकीचे - पत्रकारांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 2:12 AM

या घटनेची योग्य दखल घेऊन पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची हमी देण्याची मागणीही वार्ताहर संघाने केली.

मुंबई : शिवसेना-भाजप युतीमुळे इच्छा नसतानाही शिवसेनेला मतदान करावे लागल्याच्या दाव्यामुळे अभिनेत्री कंगना रनौतवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. कंगनाचा हा दावा फोल असल्याचे दाखवून देणाऱ्या पत्रकाराला उलट कोर्टात खेचण्याची भाषा करत किंमत चुकवावी लागेल, असा गर्भीत इशारा कंगनाने दिला. या उद्दाम भाषेमुळे कंगनाला विविध पत्रकार संघटनांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

अलीकडेच एका वाहिनीच्या मुलाखतीत कंगनाने इच्छा नसताना शिवसेनेला मतदान करावे लागल्याचे विधान केले होते. यावर ज्या मतदार यादीत कंगनाचे नाव आहे, त्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचेच उमेदवार होते. ही बाब ट्विटरवर दाखवून देणा-या पत्रकाराला कंगनाने कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. शिवाय, ही ट्रोलिंग चांगलीच महागात पडेल, असे सांगतानच ‘तरस’ची उपमा दिली. तिच्या या धमकावणीचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

मुंबई प्रेस क्लबने याची गंभीर दखल घेतली. सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला, तर पत्रकाराने सद्भावनेने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून कंगना रनौत यांनी अपशब्द वापरून अवमान केला. तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे सांगत, मंत्रालय, विधीमंडळ वार्ताहर संघाने या वृत्तीचा तीव्र निषेध केला. या घटनेची योग्य दखल घेऊन पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची हमी देण्याची मागणीही वार्ताहर संघाने केली. दरम्यान, कंगनाने यावर कोणतीच प्रतिक्रिया किंवा टिष्ट्वट संध्याकाळपर्यंत केले नव्हते.

टॅग्स :कंगना राणौत