कान्हेरीचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 05:12 AM2019-03-10T05:12:56+5:302019-03-10T05:13:13+5:30
कान्हेरीची जन्मकथा फारच नाट्यपूर्ण आणि रोचक अशा स्वरूपाची आहे.
- डॉ. सूरज अ. पंडित
कान्हेरी म्हणजे मुंबईला लाभलेला एक प्रचीन वारसा. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक, अभ्यासक या ठिकाणाला भेट देतात. या कान्हेरीची जन्मकथा फारच नाट्यपूर्ण आणि रोचक अशा स्वरूपाची आहे. मुंबई परिसरातील व्यापारी मार्ग, बंदरे आणि त्यामुळे आलेल्या सुबत्तेतून कान्हेरीच्या सुवर्ण युगाची सुरुवात झाली. एक बौद्ध मठ आणि तीर्थ म्हणून त्याची ख्याती दिगंतापर्यंत पोहोचू लागली. यातूनच बौद्ध मठाची मुळे रुजली. मुंबईच्या या प्राचीन वैभवाचा अधिक विस्तृतपणे केलेला हा उलगडा.
अंदाजे २१०० वर्षांपूर्वी कान्हेरीच्या भिक्षूसंघाचा जन्म झाला. सोपाऱ्याच्या काही भिक्षूंनी येथे येऊन भिक्षूसंघाचा पाया घातला आणि पुढे सोळाशे वर्षे कार्यरत राहिलेल्या बौद्ध मठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. इसवीसनाच्या सातव्या शतकात भारतात आलेल्या ‘ह्युएन-त्संग’ या चिनी भिक्षूने मुंबई परिसराला भेट दिली होती. त्याने त्या काळी प्रचलित असलेली कान्हेरीची जन्मकथा आपल्या प्रवासवर्णनात सांगितली आहे. अचल नावाचा एक आचार्य होता. त्याच्या आईवर त्याचे नितांत प्रेम होते. तो आचार्य होण्याआधीच त्याच्या आईचे निधन झाले.
अचलाला तिला धर्म शिकवायचा होता. ‘आईचा पुनर्जन्म पश्चिम भारतात झाला आहे’ असे त्यानी सिद्धीने जाणले व तो तिचा शोध घेत मुंबई परिसरात आला. एका गावात तो भिक्षा मागत असताना त्याला एक लहान मुलगी दिसली. ती अचलाला भिक्षा वाढण्यास आल्यावर त्याच्या तोंडून ‘आई’ अशी हाक आली. तिलाही वात्सल्य दाटून येऊन पान्हा फुटला. ती लहान मुलगीच आपली पूर्वजन्मीची आई आहे याचे अचलाला ज्ञान झाले. ती फारच लहान होती आणि अचल निर्वाणमार्गी होता. त्याने शिकवलेले ज्ञान तिच्या आकलनापलीकडचे ठरले असते. हे लक्षात येताच त्याने गावाबाहेरील ‘कृष्णगिरी’ डोंगरावर बौद्ध संघाची स्थापना केली आणि त्याच्या पश्चात त्याच्या आईला याच संघाकडून ज्ञान मिळेल अशी भविष्यवाणी केली.
ही कथा फारच नाट्यपूर्ण आणि रोचक आहे. या कथेची ऐतिहासिकता सिद्ध होऊ शकली नाही, तरी अचल ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती. कान्हेरीच्या मुख्य चैत्यतील दानकर्तंच्या लेखात एक ‘भदन्त अचला’चा उल्लेख आहे. अर्थातच या ‘भदन्त अचल’ आणि या कथेतील ‘आचार्य अचला’चा एकमेकांशी काय संबंध होता हे सांगणे कठीण आहे. मौखिक परंपरेमध्ये चारशे वर्षांत या अचलाची एक विशिष्ट प्रतिमा तयार झाली असावी आणि त्याचाच उल्लेख ह्युएन-त्संगने केला असावा.
मुंबई परिसरातील व्यापारी मार्ग, बंदरे आणि त्यामुळे आलेल्या सुबत्तेतून कान्हेरीच्या सुवर्ण युगाची सुरुवात झाली. एक बौद्ध मठ आणि तीर्थ म्हणून त्याची ख्याती दिगंतापर्यंत पोहोचू लागली. मागाठणे, सफाळे अशा गावांमध्ये कान्हेरीच्या बौद्ध मठाला दान मिळालेल्या शेत जमिनी होत्या. या गावांवर या मठाचा पगडा होता. स्थानिकांची कान्हेरीला ये-जा होती. यातूनच बौद्ध मठाची मुळे रुजली. स्थानिकांची इथे रोज रेलचेल नसावी परंतु हा मठ त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असावा.
इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत कान्हेरीच्या मठाने आजूबाजूच्या परिसरावर व तेथील साधनसंपत्तीवर आपले प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती. ‘पडण’सारखी धार्मिक स्थळे या अंमलाखाली येऊ लागली होती. उत्तरेला सोपारा होतेच. दक्षिणेला महाकालीच्या भिक्षूसंघाचा उदय झाला. पूर्वेला कल्याण, लोणाड येथे बौद्धसंघ आले. याच बौद्धसंघांच्या माध्यमातून कान्हेरीचा समाजावरील प्रभाव वाढत होता. बौद्धभिक्षू अशाच धार्मिक केंद्रातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे कार्य करत. यातूनच कान्हेरीचे तीर्थ म्हणून महत्त्व व उपासकांकडून येणारा दानांचा ओघ वाढीस लागला.
कान्हेरीचा बौद्ध मठ वटवृक्षाप्रमाणे चारही दिशांना पसरू लागला. परिसरातील गावांमध्ये कान्हेरीच्या बौद्ध मठाची संबंधित स्थानिक केंद्रे उदयाला येऊ लागली आणि यातून पुढे अनेक बौद्ध केंद्रांचा उदय झाला. याची माहिती आपण पुढील लेखात करून घेणारच आहोत.
(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)