मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून आरेत उभारण्यात येणाऱ्या कारशेडविरोधात सातत्याने आंदोलने होत असतानाच आता कांजूरमार्ग येथील जागेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. त्यामुळे ही जागा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी उपयोगी नसणारी कांजूरमार्ग येथील जागा अचानक प्राधिकरणाला महत्त्वाची कशी काय वाटू लागली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता राज्य सरकार याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींनी सातत्याने कांजूरमार्ग येथील जागेवर कारशेड उभे करावे, अशी मागणी केली होती. मात्र, या जागेवरून वाद सुरू होते. त्यात कुलाबा - वांद्रे - सीप्झ या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडसाठी नाकारण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील जमिनीची मागणी स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीसाठी केली.
एमएमआरडीएने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. प्राधिकरणाच्या या पत्रामुळे कांजूरमार्ग येथील जागा चर्चेत आली असली तरी केंद्राकडून ही जागा मेट्रो ६ साठी उपलब्ध झाली नाही तर हा प्रकल्प रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खासगी विकासकाने कांजूर येथील प्रस्तावित जागेवर दावा करून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय वादात कांजूरमार्गची जागा सापडली. राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी मेट्रो ३ ची कारशेड पुन्हा आरे येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
- मेट्रो ६ मार्गिकेचे कारशेड कांजूरमार्ग येथील जागेवर प्रस्तावित करण्यात होते.
- मेट्रो कारशेडसाठी कांजूर येथील सुमारे १५ हेक्टर जागा लागणार होती.
- मेट्रो ३ मार्गिकेचे कारशेड आरे कॉलनीत प्रस्तावित होते.
- ठाकरे सरकारने मेट्रो ३ चे कारशेड आरे येथून कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.