मुंबई – कांजूरमार्ग येथे रात्री ८.४५ च्या सुमारास मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. या आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात असल्यानं आग भडकली. आगीच्या घटनेबाबत कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे १२ बंब दाखल झाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही आग नेमकी कशी लागली? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
ऑनलाईन डिलिवरीसाठी जे ऑर्डर असतात त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्यासाठी याठिकाणच्या गोदामचा वापर केला जात होता. त्याशिवाय येथे इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती करण्याचंही काम चालतं. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु होते. सॅमसंग सर्व्हिस सेंटरशिवाय या परिसरात ३ अन्य कंपन्यांचे गोदाम आहे. त्यात सफोला एडिबल ऑयलचं गोदाम आहे. आगीचं भीषण स्वरुप पाहता ही आग आणखी भडकण्याची शक्यता आहे. आग ज्याठिकाणी लागलेली आहे त्याजवळ एक झोपडपट्टीही आहे. आगीमुळे झोपडपट्टीमध्ये येण्याजाण्याचा मार्ग बंद ठेवला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. अखेर ११.५० मिनिटांनी ही आग नियंत्रणात आली.