Join us

कांजूरचे सावंत दाम्पत्य चिपळूण पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 5:19 AM

आर्थिक गुन्हे शाखा घेणार ताबा

मुंबई : चिपळूण, मुंबईतील नातेवाइकांसह मित्र-मंडळींना गुंतवणुकीच्या नावाखाली गंडविणारे कांजूरचे सावंत दाम्पत्य नुकतेच चिपळूण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. लवकरच मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखा त्यांचा ताबा घेणार आहे.

कांजूर परिसरात अर्जुन सावंत आणि वैदेही सावंत हे दाम्पत्य राहते. सुरुवातीला सावंत याने रियल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला. त्यापाठोपाठ तो शेअरमध्ये गुंतवणूक करू लागला. याबाबत त्याने मित्रमंडळीना सांगून गुंतवणुकीचा सल्ला दिला. त्याच्या ओळखीवर नागरिक पैसे गुंतवू लागले. चौकशी न करता, नातेवाईक मंडळी पैसे देत होते. पुढे, घाटकोपरमध्ये तो आर्थिक सल्लागार म्हणून काम करू लागला. सोने, चांदी तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेवर ४ टक्के व्याज देण्याचे आमिष तो दाखवित असे. याच आमिषाला बळी पडून अनेकांनी गुंतवणूक केली. सुरुवातीला वेळेवर पैसे मिळत असल्याने नागरिकांनी जास्तीची गुंतवणूक केली.

सावंतने चिपळूणमध्येही मोर्चा वळविला. त्याने गावातील नागरिकांना जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखविल्याने त्यांनी गुंतवणूक केली. अखेर फसवणूक झाल्याने सुरुवातीला चिपळूण पोलीस ठाण्यात नागरिकांनी तक्रार दिली. त्यापाठोपाठ गेल्या महिन्यात मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने तपास सुरू केला. मुंबईत ३० हून अधिक जणांना त्याने ७ कोटींचा गंडा घातला आहे.चिपळूणमध्ये सावंत दाम्पत्याला बेड्या ठोकल्यानंतर लवकरच सावंत दाम्पत्यालाही मुंबईतील गुन्ह्यांत अटक करण्यात येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे.मुंबईत ३० हूनअधिक जणांना गंडामुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर, आर्थिक गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने तपास सुरू केला आहे. मुंबईत ३० हून अधिक जणांना त्याने ७ कोटींचा गंडा घातला आहे.