कणकवली -- प्रचाराचा हायटेक फंडा

By admin | Published: October 5, 2014 10:06 PM2014-10-05T22:06:02+5:302014-10-05T23:05:40+5:30

बलूनवर काँग्रेस नेते नारायण राणे - नितेश राणे यांचे फोटो आणि काँग्रेसची हात निशाणीसुद्धा

Kankavali - The promotion of Hi-tech Fund | कणकवली -- प्रचाराचा हायटेक फंडा

कणकवली -- प्रचाराचा हायटेक फंडा

Next

महेश सरनाईक - कणकवली --लोकसभा निवडणुकीत प्रसारमाध्यमांना हाताशी धरून आणि हायटेक प्रचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपासाठी उज्ज्वल यश संपादन करून दिले होते. त्यामुळे प्रचाराचा हा हायटेक फंडा सर्वांनाच भावला. त्यातून विधानसभा निवडणुकीत प्रत्येकानेच प्रचाराचे पारंपरिक रूप बदलून नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नितेश राणे यांनी कणकवली शहरात उंच आकाशात एक बलून (फुगा) सोडला आहे. त्या बलूनवर काँग्रेस नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांचे फोटो आहेत आणि काँग्रेसची हात ही निशाणीसुद्धा आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर युवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या नव्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे प्रचाराचे फंडे वापरण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. कणकवली मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात तरूण उमेदवार म्हणून नितेश राणे काँग्रेसतर्फे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे पारंपरिक मतदारांबरोबरच नव्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नवनवीन प्रकारे आवाहने करण्यात येत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहेच. त्याचबरोबर नितेश राणे यांनी व्हीजन डॉक्युमेंटरीचीही निर्मिती केली आहे. वैभववाडी, देवगड आणि कणकवली अशा तिन्ही तालुक्याची स्वतंत्र डॉक्युमेंटरी त्यांनी तयार केली असून, शुभारंभ रविवारी वैभववाडीपासून होणार आहे. नंतर देवगड आणि कणकवलीतही ही डॉक्युमेंटरी दाखविण्यात येणार आहे.
त्याचाच एक पुढचा भाग म्हणून कणकवली येथे काँग्रेसने शहरातील एस. टी. बसस्थानकासमोरील क्रांती हॉटेलवर सुमारे २00 फूट उंच हवेत बलून सोडला आहे. या बलूनवर काँग्रेसचे नेते उद्योगमंत्री नारायण राणे, युवानेते नितेश राणे आणि एका बाजूला पक्षाचे चिन्ह हात दाखवण्यात आले आहे. शनिवारपासून हा बलून हवेत तरंगण्यास सुरूवात झाली आहे.
सिंधुदुर्गात निवडणूक इतिहासात अशा प्रकारे हवेत बलून सोडून पहिल्यांदाच प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. कणकवलीत प्रवासानिमित्त येणाऱ्या जिल्ह्याच्या विविध भागातील प्रवाशांसाठी हा बलून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तसेच तो चर्चेचा विषयही बनला आहे.
नितेश राणे यांच्या संकल्पनेतून काँग्रेसतर्फे हायटेक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. व्हॉटसअप, फेसबुक, ट्वीटरच्या माध्यमातून प्रचाराचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्याठिकाणी लोकांची रहदारी जास्त आहे, अशा ठिकाणी प्रचारासाठी नवनवीन युक्त्या राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कणकवली बसस्थानकासमोर हा बलून आकाशात सोडण्यात आला आहे.
कणकवली मतदारसंघात आमदार प्रमोद जठार आणि नितेश राणे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. असे असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विजय सावंतही रिंगणात असल्याने दुरंगी असलेली ही लढत आता बहुरंगी झाली आहे. त्यामुळे जो उमेदवार निवडून येईल त्याला जिंकण्यासाठी पराकाष्टा करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने मतदानाचे पॉकेट सांभाळतानाच दुसऱ्याची मते कशी मिळतील, यासाठी प्रयत्न करीत आहेत.

कणकवली बसस्थानकासमोर हवेत उंच सोडण्यात आलेला बलून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Kankavali - The promotion of Hi-tech Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.