लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गर्भावस्थेत आराम करून डोहाळे पुरवून घेण्याच्या दिवसांत डॉ. सरिता दत्तात्रय बांबळे मात्र आठव्या महिन्यांतही मुलुंडच्या कोविड सेंटरमध्ये सेवा बजावत होत्या. त्यांनी मुलीला जन्म दिला असून, दोघेही सुखरूप आहेत.
कल्याण परिसरात पती, सासू आणि मुलीसोबत सरिता राहण्यास आहे. पतीही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने कोरोनाच्या काळात त्यांनी मुलीला सासूकड़े ठेवले. अशातच त्या गर्भवती राहिल्या. घरात नवीन बाळाची चाहूल लागल्याने सगळेच आनंदात होते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणात डॉक्टरांची कमतरता भासत असताना त्यांनीही पुढाकार घेतला आणि मुलुंड पूर्वेकडील मिठागर कोविड सेंटरमध्ये १५ जूनपासून ऑपरेशन हेड म्हणून रुजू झाल्या. आठव्या महिन्यांतही त्या पीपीई किट घालून काम करायच्या.
यातच कामादरम्यान नवव्या महिन्यांत त्यांना अन्नबाधा झाली. त्यामुळे त्यांना घरी थांबावे लागले. त्यांनी नुकताच मुलीला जन्म दिला असून, दोघेही सुखरूप आहे. त्यांच्या कुटुंबीयासह मुलुंडमध्येही आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या बाबतीत अभिमानाची भावनाही व्यक्त करण्यात येत आहे.
....