मुंबई - Kapil Patil on Mahavikas Aghadi ( Marathi News ) राज्यातील लोकसभा निवडणूक संपताच विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. त्यात मुंबई शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारती संघटनेने सुभाष मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र याच शिक्षक मतदारसंघात उद्धव ठाकरेंनीही त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवल्याने कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत कपिल पाटील म्हणाले की, इंडिया आघाडीत आम्ही होतो. महाविकास आघाडीत निमंत्रण दिल्यामुळे आमची समाजवादी गणराज्य पार्टी हा घटक पक्ष आहे. आम्ही जोरदार काम केले. हुकुमशाहीविरोधात आम्ही लोकशाहीच्या बाजूने होतो. कुठलीही अट शर्थ न ठेवता आम्ही साथ दिली. आघाडीचा धर्म होता, ज्याची विद्यमान जागा असते त्याला ती मिळते. मागील ३ टर्म आम्ही ही जागा लढतोय, जिंकत आलोय. भाजपा-शिवसेना आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचे तिन्ही वेळा डिपॉझिटही वाचलं नाही. त्यामुळे ही निवडणूक सुभाष मोरे जिंकतील हा विश्वास आहे. आता उद्धव ठाकरेंनी उमेदवार का दिला हे त्यांना विचारा असं कपिल पाटलांनी म्हटलं.
तसेच उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांशीही बोलणं झालं होतं. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो होतो त्यामुळे तेदेखील आमच्यासोबत राहतील अशी अपेक्षा होती. मात्र अभ्यंकरांची उमेदवारी आश्चर्य करणारी आहे. ते अधिकारी राहिले आहेत. कंत्राटीकरण, खासगीकरणाविरोधात आमची लढाई आहे. अभ्यंकराची भूमिका खासगीकरणाच्या बाजूची आहे. ही लढाई विचारांची आहे. सुभाष मोरे खासगीकराच्या विरोधात आणि पेन्शनसाठी लढणारे आहेत असंही कपिल पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, समाजवादी गणराज्य पार्टी ही लोकशाहीवादी आहे. त्यामुळे लोकशाही विचाराबाबत, धर्मनिरपेक्षाच्या प्रश्नावर आम्ही कधीही तडजोड करत नाही. त्या भूमिकेतून आम्ही मैदानात असतो. इतर पक्षांची भूमिका काय हा वेगळा भाग आहे. लोकसभेला लोकशाही, संविधान वाचवणं ही एकच भूमिका होती त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. कुणाची काल काय भूमिका होती, उद्या काय असेल याची चर्चा आम्ही केली नाही. आत्ताही लोकशाही समाजवादी भूमिकेतून उभे आहोत. खासगीकरण, कंत्राटीकरणाविरोधात आम्ही लढतोय. त्यामुळे मविआसोबत राहायची की नाही याचा निर्णय महाविकास आघाडीने घ्यायचा आहे असं आमदार कपिल पाटील यांनी इशारा दिला.
...म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय
मुंबई शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील त्यांना इतर मतदारसंघात पाठिंबा देण्याचा विचार आम्ही करू. आज शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक आमच्यासमोर आहे. शिक्षक मतदारसंघाचा मी १८ वर्ष सलग ३ टर्म आमदार आहे. माझा शिक्षक ५८ व्या वर्षी निवृत्त होतो. तोच निकष मी मला लावत निवडणुकीला उभं न राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संघटनेने सुभाष मोरे यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे ते पुढचे आमदार होतील असा विश्वास आहे असंही कपिल पाटील यांनी ठामपणे सांगितलं.