मुंबई - प्रशांत परिचारक यांचं निलंबन रद्द केल्याने आज विधानपरिषदेत विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. प्रशांत परिचारक यांचं निलंबन रद्द केल्याने संतापलेल्या विरोधकांनी त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. दरम्यान शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याने चंद्रकांत पाटील अंगावर धावून आले. त्यांनी 'मी तुला बघून घेईन' अशी धमकी दिल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे.
कपिल पाटील यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, 'चंद्रकांतदादा माझ्या अंगावर धावून आले. त्यांना दोन ते तीन मंत्र्यांनी पकडून ठेवले. ते अक्षरश: अंगावर धावून आले. तुला बघून घेतो, बदडून काढतो, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे'.
'प्रशांत परिचारकरांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे का? हा माझा प्रश्न आहे. त्याचा खुलासा सरकारने करावा. या विचारधारेचं समर्थन करतं की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. ते स्पष्ट करण्याऐवजी ज्याप्रमाणे चंद्रकांतदादा सभागृहात भाषा वापरत होते, खेदजनक आणि वेदनाजनक होती', असंही कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंनी व्यक्त केला निषेधभाजपानं संसदीय परंपरेच्या सर्व मर्यादा पार केल्या असून विधान परिषद सभागृहनेते चंद्रकांतदादा पाटील हे आज सदस्यांच्या अंगावर धावून गेले. सभागृह चालवण्याची जबाबदारी असलेले सरकारचे ज्येष्ठ मंत्री सभागृहात मुद्यांऐवजी गुद्यांवर येत असतील तर राज्यात लोकशाही नाही तर ठोकशाही आहे. सत्तारुढ भाजपच्या या ठोकशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज व्यक्त केली.