मुंबई : बिहारचे मुख्यमंत्री जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर अडचणीत आलेले जदयूचे नेते कपिल पाटील यांनी पक्षाचाच राजीनामा दिला आहे. धारावी येथे रविवारी पार पडलेल्या संयुक्त समाजवादी संमेलनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची घोषणा केली.
समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’सोबत आहोत. देश, समाजवाद वाचवण्यासाठी लोकशाही समाजवादी विचारांच्या राजकीय पक्षाचे पुनर्गठण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच ‘समाजवादी गणराज्य पार्टी’ची पुनर्स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.