Join us  

“उद्धव ठाकरे, ऐनवेळी असे का केले, लोकसभेचा निकाल डोक्यात जाऊ देऊ नका”: कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 5:11 PM

Kapil Patil News: राज्यात अनेक प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मते हवीत पण त्यांना बाजूला बसवायला नको, या शब्दांत कपिल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Kapil Patil News: विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीचे शरद पवार गट समर्थित उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. जयंत पाटील यांच्या पराभवावरून माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कपिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना थेट सवाल केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना कपिल पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव धक्कादायक आहे. मुंबईत शिक्षक भरतीची सीट घेतली. राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देऊन पराभव  केला. भाजपा पक्ष पळवतो तर तुम्ही पण तसेच का वागत आहात? असा सवाल कपिल पाटील यांनी केला. डावे आणि वंचित पक्ष जवळ घ्यायचे आणि नंतर दूर लोटायचे. मविआने निर्णय घ्यायचा आम्हाला सोबत ठेवायचे की नाही, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केला.

लोकसभा निवडणुकीत लोकांनी निकाल दिला तो डोक्यात जाऊ देऊ नका

छोट्या पक्षांनी मविआला मदत केली. नारायण नागोजी पाटील हे प्रथम विधान सदस्य होते. त्यांच्या नातवाला म्हणजे जयंत पाटील यांना त्यांचा शताब्दी अगोदर असे बाहेर काढणे चांगले नाही. ते सहज निवडून आले असते. राजू शेट्टी यांना ही यांनी दूर केले आहे. गावित यांची फसवणूक केली. शिक्षक भारतीची जागा लाटली. उद्धव ठाकरे यांनी सांगितले, मुंबई शिक्षक मतदार संघ तुमचा मग ऐनवेळी असे का केले, अशी विचारणा करत, लोकसभा निवडणुकीत लोकांनी निकाल दिला तो डोक्यात जाऊ देऊ नका, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला.

दरम्यान, राज्यात अनेक प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या. तुम्हाला मते हवीत पण त्यांना बाजूला बसवायला नको. उद्धव ठाकरे आणि कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही. मात्र आम्ही खंत व्यक्त केली आहे, आता ते काय निर्णय घेतात पाहू, असे कपिल पाटील यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :विधान परिषद निवडणूक 2024कपिल मोरेश्वर पाटीलउद्धव ठाकरेमहाविकास आघाडी