Kapil Patil Meet Raj Thackeray: एकीकडे आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरीकडे आरक्षणांच्या मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. यातच विधान परिषदेतील आमदार कपिल पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीबाबत तसेच महाविकास आघाडीत राहणार की नाही, याबाबत कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना कपिल पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडलेली दिसत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वीण तुटता कामा नये. महाराष्ट्रातील एकोपा आणि सलोखा कायम राहायला पाहिजे. यासाठी काम करण्याची गरज आहे. हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे, अशी थोडी माणसे महाराष्ट्रात आहे. त्यापैकी राज ठाकरे आहेत. म्हणूनच राज ठाकरे यांना भेटायला आलो. अनेक नेत्यांना भेटणार आहे. राजकारण बाजूला ठेवा. निवडणुका येतील आणि जातील. राज्यातील समाजा-समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये. काही लोक अकारण भडकवण्याची कामे करत आहेत. वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून राज ठाकरे यांना भेटलो, अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.
नेहमीच सामाजिक प्रश्नांवर काम करत आलो आहे
महाराष्ट्रातील शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे. एकोप्याचा सलोख्याचा, सर्वांना सोबत घेण्याचा जो विचार आहे, तो कायम राहायला हवा, असे वाटते. मी नेहमीच सामाजिक प्रश्नांवर काम करत आलो आहे. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. राजकारण माझ्यासाठी दुय्यम भाग आहे. सामाजिक प्रश्नांसाठी आणि वंचितांच्या मुद्द्यांसाठी सर्वांना भेटत असतो आणि त्या विषयी बोलत असतो. पुढाऱ्यांशी बोलतो, समाजातील घटकांशी बोलतो. हा संवाद माझा सुरूच असतो, असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी हवेत असेल, पण...
दरम्यान, कपिल पाटील महाविकास आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा आहे. यावर प्रश्न विचारला असता, माझ्याबाबतीत काय करायचे ते महाविकास आघाडी ठरवेल. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाविकास आघाडी हवेत असेल, पण येथील वंचित आणि अल्पसंख्यांक समुदायांबाबत, प्रश्नांबाबत महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.