ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट मोकळी होत नसल्याने दिग्दर्शक-निर्माता करण जोहर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहे. आज दुपारी करण जोहर, मुकेश भट्ट आणि बॉलिवूडमधील अन्य कलाकार राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना विरोध करत त्यांचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मनसेने घेतली आहे. मनसेचे अमेय खोपकर यांनी सोमवारी (17 ऑक्टोबर) मल्टिप्लेक्स मालकांना 'ए दिल है मुश्किल' सिनेमा दाखवू नका, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ, मल्टिप्लेक्समधील काचा खूप महागड्या असतात, हे विसरू नका', अशी तंबी दिली होती. तसेच, पाकिस्तानी कलाकार असलेले एकही सिनेमे दाखवणार नाही, अशी भूमिका सिनेमा ओनर्स असोसिएशननेही घेतली आहे. यामुळे सर्व बाजूंनी 'ए दिल है मुश्किल' सिनेमा अडचणीत सापडला आहे.
Karan Johar to be accompanied to meet HM Rajnath Singh by Producers Mukesh Bhatt and Siddharth Roy Kapur #ADHM— ANI (@ANI_news) October 20, 2016
करण जोहरचा सिनेमा 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार कायम आहे. करणने सिनेमाच्या वादावर मंगळवारी (18 ऑक्टोबर) मौन सोडत सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, असे आवाहन केले होते. 'मी देशभक्त आहे, माझ्यासाठी देश आधी आहे. यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले होते, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, असे आवाहन करणने केले. मात्र त्याच्या आवाहनानंतरही मनसेने आपला पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे, सिनेमाच्या प्रदर्शनाची 'मुश्किल' टळावी, यासाठी करणने आता केंद्रीय गृहमंत्र्यांकडे धाव घेण्याचे ठरवले आहे.
आणखी बातम्या
उरी ह्ल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. जागतिक पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताकडून पाकिस्तानची सर्व स्तरावर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालण्यात आली आहे.