काेराेना आला, पण पालिकेने धडा नाही घेतला! आरोग्य विभागाच्या निधीत तब्बल ५०० काेटी रुपयांची कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 08:05 AM2021-02-04T08:05:59+5:302021-02-04T08:06:44+5:30
Mumbai News : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर तरी मुंबई महापालिका प्रशासनाला आरोग्यक्षेत्राचे गांभीर्य समजेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. गेले वर्षभर कोरोनाच्या तीव्र संक्रमणामुळे शहरातील आरोग्यसेवांवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचे दिसून आले.
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर तरी मुंबई महापालिका प्रशासनाला आरोग्यक्षेत्राचे गांभीर्य समजेल अशी अपेक्षा करण्यात येत होती. गेले वर्षभर कोरोनाच्या तीव्र संक्रमणामुळे शहरातील आरोग्यसेवांवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचे दिसून आले. यामुळे यंदाच्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, अपेक्षाभंग करत मुंबई पालिका प्रशासनाने आरोग्य विभागासाठीच्या तरतुदीत घट केली आहे.
महापालिकेने आरोग्य विभागासाठी मागील तरतुदीपेक्षा ५०० कोटी रुपयांनी कमी केला आहे. चालू अर्थसंकल्पात ५,२२६ कोटींची तरतूद आहे. आरोग्य विभागासाठी पुढील अर्थसंकल्पात ४,७२८.५३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कोविड आपत्तीच्या काळात झालेला खर्च पुढील आर्थिक वर्षात लसीकरणावरही होणार असून, प्रत्यक्षात अनेक रुग्णालयीन इमारतींची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे या विभागाचा कमी केलेला निधी हा चर्चेचा विषय ठरला आहे.
कोरोना संक्रमण काळात पालिकेची आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याने विलगीकरण केंद्रे, तात्पुरती कोविड केंद्रे तसेच कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उभारण्यात आले. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राचे गांभीर्य ओळखून यासाठीची तरतूद भरीव असेल, अशी अपेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह सामान्य नागरिकांना हाेती.
विशेष म्हणजे, पालिका प्रशासनाने रस्ते, वाहतूक प्रचालन, सागरी किनारा प्रकल्प आणि पूल, प्राथमिक शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन आणि पर्जन्य जलवाहिन्या या विभागांच्या निधीत कोणतीही घट केली नसून, विभागांसाठी तरतूद वाढविली आहे.