कर्जत नगरपरिषदेत ‘एक खिडकी कक्षा’ची सुरुवात
By admin | Published: September 23, 2014 11:22 PM2014-09-23T23:22:19+5:302014-09-23T23:22:19+5:30
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
कर्जत : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसंदर्भात देण्यात येणा-या परवानग्यांसाठी आचारसंहिता कक्ष व एक खिडकी कक्ष कर्जत नगरपरिषद कार्यालय येथे स्थापन करण्यात आला आहे. कर्जत व खालापूर या दोन्ही तालुक्यांच्या परवानग्या या कर्जत नगरपरिषद कार्यालयाच्या एक खिडकी कक्षातूनच देण्यात येणार असल्याची माहिती आचारसंहिता पथक प्रमुख तथा महसूल नायब तहसीलदार अर्चना प्रधान यांनी दिली.
कर्जत नगरपरिषद कार्यालयात स्थापन केलेल्या एक खिडकी कक्षामधून चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहीर सभांची परवानगी, पोस्टर, झेंडे सभेच्या ठिकाणी लावणे याची परवानगी, खाजगी जागेवर जाहिरात फलक लावणे याची परवानगी या एक खिडकी कक्षामधून देण्यात येतील मात्र त्यासाठी अर्ज, जागा मालकाचे संमतीपत्र, नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत यांचा ना हरकत दाखला, तसेच पोलीस विभागाचा स्पीकर परवाना आदी कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे. तसेच विधानसभा मतदार संघात वाहन प्रचारासाठी वापरावयाचे असल्यास त्याची परवानगी, उमेदवाराच्या तात्पुरते प्रचार कार्यालयाची परवानगी, ध्वनिक्षेपकाची परवानगी, मिरवणूक, रोड शो, केबल जाहिरात परवानगी या सर्व परवानग्या सुध्दा याच ठिकाणाहून देण्यात येतील अशी माहिती देण्यात आली. आदर्श आचारसंहितेची योग्य अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागासाठी संबंधित गटविकास अधिकारी व शहरी भागासाठी संबंधित मुख्याधिकारी यांची संबंधित आचार संहिता प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, निवडणूक काळात तीन भरारी पथके चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. त्यात भरारी पथक, व्हिडिओ चित्रीकरण, पाहणी पथक तैनात असल्याची माहिती नायब तहसीलदार अर्चना प्रधान यांनी दिली.