Join us

कर्जतवर आता सीसीटीव्हींची नजर

By admin | Published: August 02, 2014 12:54 AM

कर्जत पोलीस ठाण्यात आठवड्यापूर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत चर्चेमध्ये शहरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्यात आठवड्यापूर्वी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत चर्चेमध्ये शहरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी संस्था, व्यापारीवर्ग, लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वप्रथम कपालेश्वर देवस्थान समितीने टिळक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला व तो अमलात आणला. आज सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. कपालेश्वर मंदिराच्या सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष हेमंत डोंबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्ञानेश्वर तिवाटणे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते कळ दाबून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष राजेश लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी बी.पी.कल्लूरकर, पोलीस निरीक्षक रमेश रतन पाटील, नगरसेविका विनिता घुमरे आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपले विचार मांडताना, कर्जतकरांमध्ये सहकार्याची भावना असल्यानेच हे काम इतक्या लवकर सुरु झाले, यानंतर शहरातील पंधरा ठिकाणी अशा प्रकारचे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे जाईल, असे स्पष्ट केले. आमदार सुरेश लाड यांनी आपल्या मनोगतात ‘कर्जतच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्र म अतिशय उपयुक्त आहे. मोक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे कॅमेरे बसविल्यास चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. एखादा गंभीर गुन्हा घडलाच तर त्याचा तपास करणे पोलीस यंत्रणेला सोपे जाईल,’असे सांगितले. या प्रसंगी राजाभाऊ कोठारी, बाळू थोरवे, यशवंत कुंभार, प्रशांत सदावर्ते, मधुकर घरत, मधुसूदन सप्रे, अनिल मोरे, प्रभाकर करंजकर, वनिता म्हसे, लीलाताई चंदन, राजा कुलकर्णी, नीलेश महाडिक,शेखर जोशी, मदन शुक्रे , संदीप भोईर, अभिजित मराठे, सुनील गोगटे आदींसह मोठ्या संख्येने कर्जतकर उपस्थित होते. (वार्ताहर)