Join us

कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग लोकलसाठी ‘अनफिट’

By admin | Published: May 24, 2015 10:48 PM

कोट्यवधी रुपये खर्चून कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग उभारण्यात आला. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र इतकी वर्षे झाली तरी अद्याप

विजय मांडे, कर्जतकोट्यवधी रुपये खर्चून कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग उभारण्यात आला. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र इतकी वर्षे झाली तरी अद्याप लोकल सेवा सुरू झाली नाही. याबाबत माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता हा मार्ग लोकल सेवा सुरू करण्यास ‘अनफिट’ आहे, असे सांगण्यात आले. मात्र या मार्गावरून नव्याने पाच एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्या गाड्यांना कर्जत रेल्वे स्थानकात थांबा न दिल्याने कर्जतकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी व आरोग्य मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या प्रयत्नाने पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचा नारळ फोडण्यात आला होता. त्यानंतर काही वर्षांनंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. सुमारे पावणे तीन कि. मी. अंतराचा हालीवली गावाजवळचा बोगदा पूर्ण झाला. या बोगद्यामध्ये वारंवार दरडी कोसळू लागल्यामुळे हा मार्ग प्रवासी वाहतुकीला धोकादायक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या मार्गावरून माल वाहतूक सुरू झाली. कालांतराने प्रवासी वाहतुकीला हिरवा कंदील मिळाला.आता लोकल सेवा सुरू होणार अशी आशा प्रवाशांना वाटू लागली मात्र त्यांचा पुन्हा भ्रमनिरास झाला. काही दिवसांपूर्वी पुणे -ग्वालियर एक्स्प्रेस, पुणे कामाख्य प्रीमियम स्पेशल, हुबळी - मुंबई साप्ताहिक एक्स्प्रेस, चेन्नई सेन्ट्रल अहमदाबाद एक्स्प्रेस आणि पूर्णा सुपरफास्ट एक्स्पे्रस या मेल एक्स्प्रेस गाड्या पनवेलमार्गे सुरू केल्या. मात्र त्यांना कर्जत स्थानकावर थांबा दिला नाही त्यामुळे कर्जत प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी ‘ रेल्वे प्रशासन आगीत तेल ओतण्याचा प्रकार करीत आहे’, अशी प्रतिक्रि या व्यक्त केली. कर्जतहून हजारो चाकरमानी, व्यावसायिक, विद्यार्थी पनवेल, वाशी - नवी मुंबई येथे दररोज जात असतात. त्यांना या मार्गाने जाणे सोयीचे आहे. मात्र लोकल सेवा सुरू केल्यास अनेकांची चांगली सोय होऊ शकते.