Join us

"कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तातडीने कारवाई करावी." नीलम गोऱ्हे यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 5:08 PM

Karnala Co-operative Bank scam case : या बँकेच्या कामकाजात  गैरव्यवहार  झाल्याने ठेवीदारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत या ठेवीदारांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. त्याचे हित लक्षात घेऊन बँकेवर तातडीने कारवाई करावी

मुंबई - कर्नाळा सहकारी बँकेत अनेक शेतकरी बांधवांच्या ठेवी आहेत. या ठेवीदराचे हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजात झालेल्या  गैरव्यवहार  प्रकरणी तातडीने कारवाई करावी असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले. 

आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाळा सहकारी बँक ठेवी धारकांना न्याय देणे,अवैध खाजगी सावकारीवर नियंत्रण,  ग्रामीण भागातील शेतीमालाचे गोदाम बांधकामबाबत सहकारी बँक व सहकार विभागाची भूमिका या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या बँकेच्या कामकाजात  गैरव्यवहार  झाल्याने ठेवीदारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत या ठेवीदारांना संरक्षण देणे महत्वाचे आहे. त्याचे हित लक्षात घेऊन बँकेवर तातडीने कारवाई करावी आणि या ठेवीदारांच्या ठेवी परत कशा देता येतील यासाठीबँकेच्या गैरव्यवहार  प्रकरणाला गती देऊन याची  चौकशी वेळेत पूर्ण करून कारवाई करावी.असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

या बँकेचे इतर बँकेत  विलीनीकरण करून या ठेवीदारांना तातडीने न्याय देता येईल का यासबंधी सहकार विभागाने विचार करून प्रस्ताव तयार करावा  यासाठी काही लोकप्रतिनिधीची मदत लागली तर त्याचा ही विचार करावा आशा सूचनाही डॉ. गोऱ्हे यांनी केल्या. राज्यात सहकार विभागांतर्गत  असलेले  प्रलंबित प्रकरणे तातडीने सोडविण्यासाठी ज्या जिल्ह्यत प्रलंबित प्रकरणाची संख्या अधिक आहे तिथे फिरते न्यायालय किंवा  जिल्ह्यात तात्पुरते न्यायालयामार्फत प्रकरणे तातडीने निकाली काढता येतील का याचा ही विचार करावा. याबाबत  विधी व न्याय विभागाशी चर्चा करून यावर निर्णय घ्यावा. बँक, पतसंस्था,खाजगी सावकारी यांच्या कडून जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्यांना तातडीने सहकार विभागांशी संपर्क साधता यावा यासाठी सहकार विभागाने  हेल्पलाईन नंबर आणि व्हाट्सअप नंबर सुद्धा जाहीर करावा त्यामुळे शेतकरी आणि ठेवीदारांना वेळीच मदत होईल असेही  डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सूचना केल्या.

सहकार विभागाचे प्रधान सचिन अरविंदकुमार म्हणाले, या  बँकेच्या गैरव्यवहार  प्रकरणी  चौकशी करून शेतकऱ्यांना आणि ठेवीदारांना दिलासा देण्यात येईल, तसेच राज्यातील ज्या बँकेचे अनियमित व्यवहार झाले आहेत त्या सर्व बँकेचे मागील पाच वर्षातील लेखा परिक्षणाचे अहवाल तपासून दोषींवर  कारवाई करण्यात येईल.

बैठकीला साखर आयुक्त अनिल कवडे, कृषी व पणन संचालक सतिश सोनी, अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंग, पोलीस विशेष महानिरीक्षक सीआयडी रंजन शर्मा, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी अरुण इंगळे, कांतीलाल कडू, अँड. निलेश हेलोंडे तसेच सहकार, पोलीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :नीलम गो-हेरायगड