Join us

Karnatak Result: कर्नाटक निकाल, हनुमान चालिसातील कडवं सांगत आव्हाडांनी भाजपला डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:49 PM

कर्नाटकमध्ये भाजपने जय हनुमान म्हणत बजरंगबलीचा मुद्दा प्रचारात आणला होता.

मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. ईसीच्या वेबसाईटवरील सध्याच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. तर भाजपाची गाडी ८० जागांच्या आतच अडखळल्याचं चित्र आहे. आता निवडणुकीत काँग्रेसच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत काँग्रेस नेते आणि त्यांच्या सहकारी पक्षातील नेतेही प्रतिक्रिया देत आहेत. कर्नाटकमधील काँग्रेसचा विजय हा मोदी-शहांचा पराभव असल्याचं अनेकांनी म्हटलंय. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले. तर, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बजरंगबलीच्या मुद्द्यावरुन टोला लगावला आहे.

कर्नाटकमध्ये भाजपने जय हनुमान म्हणत बजरंगबलीचा मुद्दा प्रचारात आणला होता. त्यामुळे, बजरंगलीच्या नावाने भाजपने मत मागितल्याचा आरोपही विरोधकांनी भाजपवर केला. मात्र, कर्नाटक निवडणुकीतील निकालानंतर भाजपला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. त्यावरुनच, बजरंगबलीने भाजपच्या डोक्यात गदा मारली, असे म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही हनुमान चालिसामधील एक कडवं ट्विट करत बजरंबली दुर्जनांचं निराकरण करतात, ते सज्जनांच्या बाजुने उभे राहतात, असे म्हणत भाजपला लक्ष्य केलंय. 

कर्नाटक निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झालीय.काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवत असल्याचं स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत भाजपने बजरंग बली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. परंतु, खुद्द प्रभू हनुमानाला देखील ही गोष्ट आवडलेली दिसत नाहीये. हनुमान चालिसा मध्ये एक कडव आहे.

"महाबीर बिक्रम बजरंगी।कुमति निवार सुमति के संगी..!"अर्थात-महावीर बजरंग बली हे पराक्रमी आहेत.ते दुर्जनांच निराकरण करतात  तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात.

थोडक्यात आज खुद्द बजरंग बलीने देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे, असे ट्विट आव्हाड यांनी केलंय. आव्हाड यांनी भाजप नेत्यावर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाले संजय राऊत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, जर कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयी होत असेल, तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पराभव आहे. आपला पराभव डोळ्यांसमोर पाहून त्यांनी बजरंगबलीला मैदातान उतरवले. मात्र त्यांची गदा भाजपावरड पडली आहे. कर्नाटकमध्ये तेच होत आहे. जे २०२४ मध्ये होणार आहे, असे भाकितही संजय राऊत यांनी केले. 

टॅग्स :कर्नाटकनिवडणूकभाजपाजितेंद्र आव्हाड