लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा विषय धगधगत असतानाच मुंबईत नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्ट बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिरातींचे पोस्टर झळकवण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा यातून दुटप्पीपणा दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे बेळगावच्या हिरे बागेवाडीजवळ कन्नड रक्षक वेदिका संघटनेकडून महाराष्ट्रातील एसटीची तोडफोड करण्यात आली. असे असतानाही बेस्ट बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती झळकवण्यात आल्या आहेत. ‘कर्नाटक नव्याने पाहा’, अशा मथळ्याच्या या जाहिराती असून या जाहिरातींमुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी याबाबत ट्वीट करत सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.