'नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे बसवराज बोम्मईंना सरळ करतील'; शिंदे गटाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 01:46 PM2022-12-10T13:46:30+5:302022-12-10T13:50:01+5:30

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे.

Karnataka Chief Minister Basavaraj Bommai has been criticized by Shinde group minister Gulabrao Patil. | 'नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे बसवराज बोम्मईंना सरळ करतील'; शिंदे गटाचा निशाणा

'नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे बसवराज बोम्मईंना सरळ करतील'; शिंदे गटाचा निशाणा

googlenewsNext

महाराष्ट्रकर्नाटकच्या सीमाप्रश्न पेटला असताना, त्यावर फुंकर घालण्यासाठी आता केंद्र सरकार पुढाकार घेणार आहे. सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आपण स्वत: हस्तक्षेप करू, तसेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिले. मात्र यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांना भेटून काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. 

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कळवलं आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असं बसवराज बोम्मई यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

'काहीही फरक...'; अमित शाह अन् महाराष्ट्रातील खासदारांच्या भेटीवर बसवराज बोम्मई बरळले!

बसवराज बोम्मईंच्या या ट्विटवर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. आम्ही राज्यात एकत्र आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची अस्मिता एकच आहे, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, १२ डिसेंबरला गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यानंतर, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, प्रियांका चतुर्वेदी, ओम राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, डॉ.अमोल कोल्हे, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, रजनी पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

चार खासदार पंतप्रधानांना भेटले-

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेशच्या राज्यसभेतील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश होता. यावेळी वादग्रस्त मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांना पत्र पाठविले होते. ते पत्र व या बैठकीचा संबंध नाही. ही नियमित बैठक होती. अशा बैठकीत पंतप्रधान राज्यातील प्रश्न समजून घेतात, असे भाजपचे खा. प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खा. उदयनराजे भोसले, खा. धनंजय महाडिक व खा. डॉ.अनिल बोंडे उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Karnataka Chief Minister Basavaraj Bommai has been criticized by Shinde group minister Gulabrao Patil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.