Join us

VIDEO- देशात पहिला येण्याचा विचारही केला नव्हता, देदीप्यमान यशानंतर कार्तिकेयची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 3:28 PM

जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced Result 2019) चे निकाल आज जाहीर झाले असून, यात महाराष्ट्राने बाजी मारली आहे.

मुंबई: जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced Result 2019) चे निकाल आज जाहीर झाले असून, यात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणारा कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्यांने यंदाच्या निकालात देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर कार्तिकेयनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयआयटी मुंबईत सीएस ब्रान्च मिळाल्यानंतर मी निश्चिंत होतो. पण देशात पहिला क्रमांक येईल, असा मी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर कार्तिकेयने दिली आहे.मी फार खूश आहे, कुटुंबीयही फार खूश आहेत. मी जेईई एडवान्सचीच तयारी केली होती. त्यामुळेच ही परीक्षा मला सोपी गेली. दिवसातून सहा ते सात तास अभ्यास करायचो, दोन वर्षं माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता. साध्या फोननं काम चालवायचो, त्याकाळात मी सोशल मीडियापासूनही दूर होतो. मी फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलं होतं, असंही कार्तिकेय म्हणाला आहे. काही प्रश्न असले तर शिक्षकांनी नेहमीच मदत केली. खूप चांगला अभ्यास करणारे मित्र इथे मिळाले. नियमित लेक्चरनंतर 6 ते 7 तासांचे स्वतंत्र वेळापत्रक बनवून अभ्यास केला. स्वत:च मॉक टेस्टही दिल्या.सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या दिवशी एखादा प्रश्न अडला तर तो प्रश्न त्याच दिवशी निकालात काढून मगच झोपणं हा नियम स्वत:ला घालून दिला, असं सांगत त्यानं आपल्या यशाचं गमक सर्वांसोबत शेअर केले. कार्तिकेयने जेईई ऍडव्हान्स परीक्षा 2019मध्ये 372 पैकी 346 गुण मिळवत ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केला आहे. 27 मे रोजी आयआयटीमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. कार्तिकेय हा महाराष्ट्रातील चंद्रपूरचा रहिवासी आहे. कार्तिकेय यापूर्वी जेईई मेन परीक्षेत 100 पर्सेन्टाईल स्कोअर करून ऑल इंडियात 18वा रँक तसंच महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला होता. याच वर्षी बारावीच्या परीक्षेत त्याने 93.7 टक्के गुण मिळवले आहेत.