Join us

बाप्पाच्या भक्तिरसात रंगली खेतवाडी!

By admin | Published: September 25, 2015 2:40 AM

गिरणगावातील लालबाग, परळ आणि डिलाईल रोडनंतर रात्रभर रांगा लावण्याची परंपरा आजमितीस खेतवाडी परिसरात अविरत सुरू आहे

मुंबई : गिरणगावातील लालबाग, परळ आणि डिलाईल रोडनंतर रात्रभर रांगा लावण्याची परंपरा आजमितीस खेतवाडी परिसरात अविरत सुरू आहे. दक्षिण मुंबईतील खेतवाडी गल्लीत गणरायाच्या मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. एकूण १४ गल्ल्या असलेल्या खेतवाडीत १३ गल्ल्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.गणेशोत्सवामुळे खेतवाडी पूर्वीपासूनच चर्चेत आहे. मोठमोठ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गणपतीच्या मूर्ती पाहायला परिसरात माणसांची झुंबड उडते, जणू काही एखादी जत्राच. गणेशोत्सवात भलेमोठे मंडप उभारलेल्या लहान-मोठ्या चिंचोळ्या गल्ल्या, भव्य-दिव्य मूर्ती हे तिथल्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. गणपती पाहण्यासाठी दिवसरात्र उडालेली माणसांची झुंबड, लहान मुलांचा हात घट्ट धरून या गर्दीतून मुंगीच्या पावलांनी वाट काढत जाणारी मंडळी; आणि त्या गर्दीतही एखाद्या कोपऱ्यात मधूनच दिसणारे पोटपूजेचे स्टॉल्स असा दाटीवाटीने गर्दीने फुलून गेलेला खेतवाडीचा परिसर या काळात दिसून येतो. यंदाही विविध रूपातील भव्य मूर्ती, चलचित्रे आणि देखाव्यांच्या संकल्पनाही समाजमनाला भिडणाऱ्या ठरत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ‘सेल्फी’चा ट्रेंड अधिक असल्याने बाप्पांचे दर्शन घेण्यास येणारे कॉलेजिअन्स अगदी मन भरून सेल्फी काढण्यात दंग असल्याचे पाहावयास मिळते. भव्यदिव्य मोतीमहल खेतवाडी १२वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भव्यदिव्य असा मोतीमहल उभारला आहे. कलादिग्दर्शक दिलीप शिरोडकर यांनी या मोतीमहलाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. यंदा या मंडळाचे ५७वे वर्ष असून, १४ फुटांची सिंहासनारूढ श्रींची मूर्ती येथे विराजमान झाली आहे. या मंडळाने गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी ‘गणराज’ लिहिलेले बँड्स विक्रीसाठी ठेवले आहेत. विशेष म्हणजे, हे बँड्स बाप्पाच्या दर्शनाला येणारे कॉलेजिअन्सच्या पसंतीस उतरत आहे.खेतवाडी १३वी गल्लीचे यंदा ४६वे वर्ष असून, यंदा लालबागचा राजाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे. शिवाय, येथे ‘कुंभकर्णाला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न’ या संकल्पनेवर १० मिनिटांच्या अवधीचा देखावा साकारण्यात आला आहे. या मंडळाने गेल्या वर्षीही हनुमानाच्या जन्मकथेवर आधारित देखावा साकारला होता. दरवर्षी पौराणिक विषयांवर चलचित्राच्या माध्यमातून देखावा साकारण्याकडे मंडळाचा कल असतो, असे मंडळाचे अध्यक्ष वसंत निकम यांनी सांगितले.