Karuna Sharma: माझा नवरा 15 वर्षांपासून आमदार पण; घरं वाटपावरुन करुणा शर्मांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 06:10 PM2022-03-25T18:10:54+5:302022-03-25T18:21:06+5:30
मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीहीमुंबईत हक्काचं घर असणार असल्याचं सांगितलं. सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. या घोषणेचं सभागृहातील आमदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. मात्र, या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. सोशल मीडियातूनही या निर्णयावर नाराजी दर्शविण्यात येत आहे. मनसेनंतर भाजपने या घरांना विरोध केला आहे. आता, एका आमदाराच्या पत्नीनेच या निर्णयाला विरोध केला आहे.
मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. तर, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हा खर्च कुणाच्या सांगण्यावरुन, असा सवाल विचारला आहे. एकूणच आमदारांच्या घरांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयावरुन गोंधळ उडाला असून सर्वसामान्यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. त्यानंतर, आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनीही या निर्णयाला विरोध करताना, मुख्यमंत्र्यांना चांगलाच टोला लगावला आहे.
'मुंबईतील आझाद मैदानात आजही आरोग्य सेविकांपासून एसटी कर्मचारी, ग्रामीण भागांत तळागाळात काम करणारे अनेक शिक्षक बेमुदत उपोषण करत आहेत. केवळ 10 ते 12 हजार रुपयांच्या पगारासाठी त्यांना उपोषण करावं लागत आहे. त्यांचा साधा आवाजही मुख्यमंत्र्यांना ऐकू जात नाही, हे भयंकर आहे, असे म्हणत करुणा शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. तसेच, मी स्वत: एका आमदाराची पत्नी आहे. माझा नवरा 15 वर्षांपासून आमदार आहे. एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते हे मला चांगलं माहीत आहे. आज अनेक आमदारांकडं कोट्यवधींची आणि अब्जावधींची प्रॉपर्टी आहे, असेही करुणा शर्मा यांनी सांगितले. उद्धव ठाकरे हे आमदारांची घरं भरण्यासाठी मुख्यमंत्री झालेत की गोरगरीब लोकांची दु:ख दूर करण्यासाठी,' असा खोचक सवालही शर्मा यांनी विचारला आहे. सरकारने आमदारांना घरं देण्याचा निर्णय कायम ठेवल्यास मी संपूर्ण राज्यात उग्र आंदोलन करेन, असा इशाराही दिला आहे.
आमदारांना घरं फुकट नसून 70 लाख रुपयांत
''आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय.मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.'', असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांनी आमदारांच्या घरावरुन होणाऱ्या टिकेनंतर हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे, आता 70 लाखांत आमदारांना घर मिळणार यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहावे लागणार आहे.
मोफत घरांपेक्षा 200 युनिट वीज मोफत द्या
मनसेच्या आमदाराने ठाकरे सरकारला (Thackeray Government) 'कामाचा' सल्ला दिला आहे. राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आमदारांना मोफत घरे कशासाठी?" असं म्हणत निशाणा साधला. "आमदारांना मोफत घरे कशासाठी? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत वीज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा" असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.