Join us

"हॅलो, कसाबचा भाऊ बोलतोय...", मुंबई पोलिसांना फोन अन् उडाली खळबळ, पुढे काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:01 IST

Mumbai Police Arrest: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दहशतवादी अजमल कसाब याचा भाऊ बोलत असल्याचं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली.

मुंबई: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आपण दहशतवादी अजमल कसाब (Ajmal Kasab) याचा भाऊ बोलत असल्याचं सांगून पोलीस मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली. या निनावी फोननंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आणि तातडीनं तपासाला सुरुवात केली गेली. पोलिसांनी काही तासांत फोन करणाऱ्या व्यक्तीलाही शोधून काढलं. फोन करणारा व्यक्ती २८ वर्षांचा असून तो खासगी कंपनीचा सुरक्षारक्षक आहे. मुलुंडचा रहिवासी असणाऱ्या या व्यक्तीनं दारुच्या नशेत पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केल्याचं सांगण्यात आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव पियूष शुक्ला असून त्यानं दारुच्या नशेत फोन केल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे. तसंच त्यानं दिलेल्या धमकीत काहीच तथ्य नसल्याचंही सांगितलं आहे. 

आरोपीनं असं का केलं?पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीनं फोन करुन कसाबचा भाऊ बोलत असल्याचा दावा करत पोलीस मुख्यालय उडवणून देण्याची धमकी दिली. त्यानंतर तातडीनं त्याचा मोबाइल नंबर ट्रेस करण्यात आला. तो मुलुंडचा असल्याचं कळलं. त्यानंतर मुलुंड पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली. गुन्ह्याची नोंद झाली आणि तातडीनं शोध सुरू केला गेला. ठाण्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा शुक्ला मद्यमान करुन ट्रेननं प्रवास करत होता. त्यावेळी त्याच्या चुकीच्या वर्तनामुळे मुलुंडला पोहोचताच रेल्वे सुरक्षा पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला लोकलमधून खाली उतरवलं. स्थानकाबाहेर हाकलून दिलं. ज्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि रागाच्या भरात त्यानं तक्रार करण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला, परंतु तिथंही त्यानं वाद गातला आणि पोलिसांनाच धमकी दिली. 

शुक्लाचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची सगळी माहिती काढली. तेव्हा त्याच्याकडून कोणताच धोका नसल्याचं लक्षात आलं. आरोपीनं मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्यानं असा प्रकार केल्याचं पोलिसांना तपासात आढळून आलं. त्याला कायदेशीर नोटीस बजावत समज देण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबईअटक