क्षयरोग नियंत्रणासाठी तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:46 AM2017-07-30T02:46:56+5:302017-07-30T02:46:59+5:30

क्षयरोग नियंत्रणासाठी व प्रतिबंधासाठी १ ते १५ आॅगस्टदरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे.

kasayaraoga-naiyantaranaasaathai-tapaasanai | क्षयरोग नियंत्रणासाठी तपासणी

क्षयरोग नियंत्रणासाठी तपासणी

Next

मुंबई : क्षयरोग नियंत्रणासाठी व प्रतिबंधासाठी १ ते १५ आॅगस्टदरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. याअंतर्गत साधारणपणे ९ लाख लोकांची तपासणी होणार आहे. सायंकाळी ४ ते रात्री ८ या काळात हे काम केले जाणार
आहे.
महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगविषयक तपासणी नियमितपणे केली जाते. याअंतर्गत १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान, १७ लाख ९२ हजार ३०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. याचप्रमाणे, नियमित स्वरूपात तपासणी करण्यात येत आहे.
तथापि, १ ते १५ आॅगस्ट २०१७ दरम्यान विशेष तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या ७० परिसरांमधील साधारणपणे १ लाख ९२ हजार १५४ घरांतील सुमारे ९ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी अभियानासाठी महापालिकेच्या ३२७ चमू कार्यरत राहणार आहेत.
या चमूंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्याने सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत भेटी देऊन क्षयरोगविषयक वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास, ही चमू दिवसातील इतर वेळीदेखील भेटी देऊन तपासणी करेल.

१४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
२ आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप किंवा सायंकाळच्या वेळेस ताप येणे, लक्षणीय स्वरूपात वजन कमी होणे, थुंकीमधून रक्त पडणे, छातीत दुखणे, मानेवर सूज असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.
अशी लक्षणे आढळून आल्यास, संबंधितांनी तातडीने महापालिकेच्या वा सरकारी रुग्णालयातून क्षयरोगाची चाचणी करवून घ्यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत असते, तसेच ज्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्यास क्षयरोगाची बाधा असल्याचा इतिहास आहे किंवा ज्यांना यापूर्वी क्षयरोगाची बाधा झाली होती, अशा व्यक्तींनी क्षयरोगांच्या लक्षणांबाबत अधिक जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे.

रुग्णांनी औषधे घेण्याबाबत राबविण्यात येत असलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार औषधे घेतल्यानंतर, एका निर्धारित भ्रमणध्वनी क्रमांकावर रुग्ण ‘मिस कॉल’ देत आहेत. हा क्रमांक एका विशिष्ट संगणकीय सॉफ्टवेअरला जोडलेला असल्यामुळे किती रुग्णांनी नियमितपणे औषध घेतले किंवा घेतले नाही, याबाबतची माहिती संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होत आहे, तसेच औषध न घेणाºया रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व समुपदेशन करणेही शक्य होत आहे.

प्राथमिक तपासणीदरम्यान आढळणाºया संशयित रुग्णांची बेडक्याची तपासणी, ही त्या परिसराच्या जवळपास असणाºया सरकारी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तर क्ष-किरण चाचणी ही निर्धारित करण्यात आलेल्या खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत केली जाणार आहे, यासाठी संशयित रुग्णाला विशेष ‘व्हाउचर’ देण्यात येणार आहे. ज्यामुळे संशयित रुग्णाला निर्धारित करण्यात आलेल्या खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये जाऊन ही चाचणी मोफत करून घेता येणार आहे. या अभियानादरम्यान क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत.
- डॉ. दक्षा शहा, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी (क्षयरोग), मुंबई महापालिका

Web Title: kasayaraoga-naiyantaranaasaathai-tapaasanai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.