क्षयरोग नियंत्रणासाठी तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:45 AM2017-07-31T00:45:49+5:302017-07-31T00:45:49+5:30
क्षयरोग नियंत्रणासाठी व प्रतिबंधासाठी १ ते १५ आॅगस्टदरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे.
मुंबई : क्षयरोग नियंत्रणासाठी व प्रतिबंधासाठी १ ते १५ आॅगस्टदरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. याअंतर्गत साधारणपणे ९ लाख लोकांची तपासणी होणार आहे. सायंकाळी ४ ते रात्री ८ या काळात हे काम केले जाणार
आहे.
महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगविषयक तपासणी नियमितपणे केली जाते. याअंतर्गत १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान, १७ लाख ९२ हजार ३०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. याचप्रमाणे, नियमित स्वरूपात तपासणी करण्यात येत आहे.
तथापि, १ ते १५ आॅगस्ट २०१७ दरम्यान विशेष तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या ७० परिसरांमधील साधारणपणे १ लाख ९२ हजार १५४ घरांतील सुमारे ९ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी अभियानासाठी महापालिकेच्या ३२७ चमू कार्यरत राहणार आहेत.
या चमूंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्याने सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत भेटी देऊन क्षयरोगविषयक वैद्यकीय तपासणी केली जाणार
आहे.
घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास, ही चमू दिवसातील इतर वेळीदेखील भेटी देऊन तपासणी करेल.