मुंबई : क्षयरोग नियंत्रणासाठी व प्रतिबंधासाठी १ ते १५ आॅगस्टदरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची चमू घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे. याअंतर्गत साधारणपणे ९ लाख लोकांची तपासणी होणार आहे. सायंकाळी ४ ते रात्री ८ या काळात हे काम केले जाणारआहे.महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगविषयक तपासणी नियमितपणे केली जाते. याअंतर्गत १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान, १७ लाख ९२ हजार ३०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. याचप्रमाणे, नियमित स्वरूपात तपासणी करण्यात येत आहे.तथापि, १ ते १५ आॅगस्ट २०१७ दरम्यान विशेष तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या ७० परिसरांमधील साधारणपणे १ लाख ९२ हजार १५४ घरांतील सुमारे ९ लाख व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी अभियानासाठी महापालिकेच्या ३२७ चमू कार्यरत राहणार आहेत.या चमूंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरांना प्राधान्याने सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत भेटी देऊन क्षयरोगविषयक वैद्यकीय तपासणी केली जाणारआहे.घरातील व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास, ही चमू दिवसातील इतर वेळीदेखील भेटी देऊन तपासणी करेल.
क्षयरोग नियंत्रणासाठी तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:45 AM