मुंबई- Kasba Bypoll Result: गेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील पोटनिवडणुकीचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जात असलेला कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. यावरुन आता भाजपने कसबा मतदारसंघात उमेदवार देण्यात चूक केल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत, यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"कसबा मतदारसंघात आम्ही मतदारापर्यंत गेलो आहे, जनतेने कौल दिला नाहीतर आम्ही आत्मपरिक्षण करु, आम्ही चिंचवडमध्येही तशीच निवडणूक लढली आहे. चिंचवडमध्ये आम्ही पुढे आहोत. यामुळे आम्ही कसबा मतदारसंघात आत्मपरिक्षण करु, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे निकाल स्वीकारतो; भाजपाच्या हेमंत रासनेंची प्रांजळ प्रतिक्रिया
"कसब्यात आम्ही दिलेले हेमंत रासने हे उत्तम उमेदवार आहेत. त्यांनी महापालिकेत चांगले काम केले आहे. या मतदारसंघातील सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून उमेदवारी देतो. पण, शेवटी जनता ठरवत असते, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपाचा गड ढासळला; काँग्रेस विजयी
कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. याठिकाणी भाजपाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४०० मतांनी विजयी झाले आहेत. धंगेकरांना ७२,५९९ मते मिळाली तर भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांना ६१,७७१ मते मिळाली.
"मीच कुठेतरी कमी पडलो, विनम्रपणे निकाल स्वीकारतो"
सध्याच्या आकडेवारीनुसार हेमंत रासने यांनी माध्यमांशी बोलताना प्रांजळ कबुली दिली. मी बुथवाईज आकडेवारी पाहिल, त्यानंतर, सर्व गोष्टीचं बारकाईनं विश्लेषण करील. मात्र, मी कुठे कमी पडलो ते मी पाहिन, मला आत्मचिंतन करावं लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे कबसा पेठ मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी दिली. पक्षाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास दर्शवला, सर्व यंत्रणा माझ्यासाठी काम करत होती. मात्र, केवळ मी उमेदवार म्हणून कमी पडलो, जो निकाल लागला तो मी स्विकार करतो, असेही त्यांनी म्हटलंय.