Ravindra Dhangekar, Raj Thackeray: नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. कसबा विधानसभा मतदारसंघात गेली ३० वर्षे भाजपाचे वर्चस्व होते, पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला. यापूर्वी १९९१ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळाला होता. त्यानंतर यावर्षी रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले. सध्या काँग्रेसमध्ये असले तरी धंगेकर हे मूळचे राज ठाकरेंच्यामनसेचे होते. त्यामुळेच कसब्यातील विजयानंतर आज, धंगेकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी धंगेकरांना भरून आलं अन् ते भावनिक झाल्याचं दिसलं.
"राज ठाकरे हे दिलदार माणूस आहेत. त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे. मध्येमध्ये मी त्यांना भेटलो पण आज ही जिव्हाळ्याची भेट होती. मी मनसे जरी सोडली असली तरी मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मी कधीही त्यांच्यावर टीका केली नाही. त्यांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली, वहिनी स्वत: प्रचाराला होत्या. त्यामुळे माझ्या आणि त्यांच्या कुटुंबाचे नातं हे आपुलकीचं आहे. माणसं ओळखण्यात ते खूप चांगले आहेत. त्यांना भेटल्यानंतर काय बोलावं हे शब्द फुटत नव्हते. मी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला सोडून गेलो, त्यामुळे आज त्यांच्यासमोर बोलताना एक अपराधीपणाची भावना होती", अशा शब्दांत रविंद्र धंगेकर यांनी भावना व्यक्त केल्या.
"राज ठाकरे हे अतिशय चांगले नेते आहेत. ते स्वत:च्या पंगतीत आम्हाला शेजारी ताट लावून जेवायला बसवायचे. त्या सगळ्या गोष्टींची जाण अजूनही मनात आहे. निवडणूक जिंकल्यावर त्यांना भेटणार हे नक्की होतं. कारण पाच-सहा वर्षे त्यांना सोडून गेल्यामुळे लांब होतो. आज त्यांना भेटलो, मन थोडं मोकळं झाल्यासारखं वाटलं," असेही धंगेकर म्हणाले.
कसब्यात मनसेने धंगेकरांना मदत केली?
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निकाल समोर आल्यानंतर मनसेबाबत एक गौप्यस्फोट केला होता. "निकाल समोर येण्याअगोदर काही बोलण चुकीचे आहे म्हणून बोललो नव्हतो. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी झाली आहे. आम्ही कसब्यात योग्य उमेदवारी दिली. रविंद्र धंगेकर योग्य उमेदवार ठरला. धंगेकर हे तळागाळात काम करणारा नेता आहे. त्याने महापालिकेतही उत्तम काम केले आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकजुटीने काम केले यामुळे हा विजय झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना जाऊन सांगितले की, आम्ही रविंद्र धंगेकर यांना मदत करणार आहे तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा", असा दावा अजित पवार यांनी केला होता.