Join us

बनाव रचणाऱ्या कश्यपला अटक

By admin | Published: October 05, 2016 3:35 AM

आपल्याकडे असलेली बॅग गाईच्या कातड्याची असल्याच्या संशयावरून एका स्वयंघोषित गोरक्षक रिक्षाचालकाने दमदाटी केल्याची बतावणी बरुण कश्यप याने केली होती.

मुंबई : आपल्याकडे असलेली बॅग गाईच्या कातड्याची असल्याच्या संशयावरून एका स्वयंघोषित गोरक्षक रिक्षाचालकाने दमदाटी केल्याची बतावणी बरुण कश्यप याने केली होती. मात्र त्याने दिलेली तक्रार हा सगळा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. त्यानुसार मंगळवारी कश्यपला अटक करण्यात आल्याचे अंबोली पोलिसांनी सांगितले.अंधेरीत एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या कश्यपवर गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी त्याला अटक केल्याची माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली. बरुणच्या घर ते त्याच्या आॅफिसपर्यंतचे सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर पोलिसांना दिलेल्या तक्रारीप्रमाणे कोणताही प्रकार घडल्याचे दिसून आले नाही. गोरक्षकाचे जे वर्णन त्याने दिले होते त्या वर्णनाच्या ‘टीका’ लावलेल्या रिक्षावाल्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रेखाचित्र तयार केले. रेखाचित्रावरून त्या वर्णनाच्या व्यक्तीला शोधण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी अंबोली, ओशिवरा आणि डी.एन. नगर परिसरातील जवळपास ४९ रिक्षाचालकांची चौकशी केली. मात्र अशी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीबाबतची माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घटनेची जी वेळ कश्यपने पोलिसांना दिली त्या वेळी तो घरातच होता, हे त्याच्या मोबाइल कॉल रेकॉर्ड्सवरून सिद्ध झाले. इतकेच नव्हेतर, आॅफिसला जाण्यासाठी उशीर झाल्याने तो खोटे बोलल्याचे त्याने लेखी स्वरूपात कबूल केल्याचे अंबोली पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, त्याला बुधवारी कोर्टात हजर केले जाणार असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. कश्यपकडून बळजबरीने गुन्हा कबूल करवून घेतला जात असल्याचा आरोप काही राजकारणी लोकांकडून पोलिसांवर केला जात आहे. मात्र त्यात काही तथ्य नसून कश्यपविरुद्ध ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)