मुंबई : पावसाळी आजार रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना आखण्यात मग्न असताना रुग्णालयांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये दुरुस्तीच्या कामामुळे अस्वच्छता पसरली होती. आता पावसाळा संपत आल्यावरदेखील साथीच्या आजारांसाठी असणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयाची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. याचा नाहक त्रास रुग्णांना होतो आहे.मुंबईमध्ये साथीच्या आजारांसाठी कस्तुरबा हे विशेष रुग्णालय आहे. येथे पावसाळी आजार झालेल्या रुग्णांना दाखल करण्यात येते. येथे डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, कावीळ अशा सर्व आजारांसाठी वेगळे वॉर्ड आहेत. यामुळे साथीचा रुग्ण इथे आल्यावर बरा होणार याची मुंबईकरांना खात्री असते. मात्र यंदाच्या वर्षी या रुग्णालयाची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसून आले आहे. रुग्णालय इमारतीची डागडुजी न केल्यामुळे दुसऱ्या मजल्याला गळती लागलेली आहे. पाऊस आला की वॉर्डमध्ये, कॉरीडोरमध्ये बादल्या, भांडी ठेवली जातात. रुग्णाच्या खाटेच्या बाजूला प्रसंगी रुग्णांवर पाणी पडते. यामुळे रुग्णांच्या बरोबरीने रुग्णांच्या नातेवाइकांनादेखील याचा त्रास होत आहे. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. (प्रतिनिधी)
कस्तुरबा रुग्णालय दुरुस्तीअभावी ‘आजारी’
By admin | Published: September 13, 2014 1:49 AM