Join us

‘कथा’ भारतीय भाषांच्या ध्येयवेड्या संवर्धकाची! राज्य शासनाचा पुरस्कार; साहित्य प्रचारासाठी कथाकथनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:57 AM

इंग्रजीच्या प्रभावामुळे अनेक भारतीय भाषा अडचणीत आल्या आहेत. प्रादेशिक भाषांतील नवसाहित्यनिर्मितीही मंदावली आहे. मात्र उपलब्ध साहित्य नव्या पिढीपर्यंत नेण्याचे आव्हान जाहिरात क्षेत्रातील एका ज्येष्ठ लेखकाने पेलले आहे.

- संकेत सातोपे 

मुंबई : इंग्रजीच्या प्रभावामुळे अनेक भारतीय भाषा अडचणीत आल्या आहेत. प्रादेशिक भाषांतील नवसाहित्यनिर्मितीही मंदावली आहे. मात्र उपलब्ध साहित्य नव्या पिढीपर्यंत नेण्याचे आव्हान जाहिरात क्षेत्रातील एका ज्येष्ठ लेखकाने पेलले आहे. कथाकथन या माध्यमाचा आधार घेत जमील गुलरेज यांनी नवतरुणाच्या उत्साहाने भारतीय भाषांतील साहित्य संवर्धनाचा विडा उचलला आहे. राज्य शासनाने त्यांना उर्दू साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या प्रयत्नांची दखल घेतली आहे.भारतीय भाषा म्हणजे भारतीय संस्कृती, समृद्ध परंपरा असल्याचे जमील यांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे संस्कृती संवर्धकांनीही भाषा संवर्धनाकडे वळावे, असे ते आवर्जून सांगतात. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी यू ट्युबचा उपयोग करून उर्दूतील उत्तमोत्तम कथा रसिकांसाठी सादर करण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्यांच्या यू ट्युब चॅनेलला चांगला प्रतिसाद मिळाला, तो तब्बल २ लाख लोकांपर्यंत पोहोचला.उर्दू ही त्यांची मातृभाषा असली, तरीही त्यांना अन्य भारतीय भाषांबाबतही तितकीच आपुलकी, स्नेह आहे. त्यातही हिंदी, मराठीसारख्या भाषा, त्यातील साहित्य याची त्यांना गोडी आहे. त्यामुळे केवळ यू ट्युब पुरतेच न थांबता त्यांनी फेब्रुवारी २०१६मध्ये कथाकथन या बहुभाषिक व्यासपीठाची निर्मिती केली. कथाकथनच्या माध्यमातून उर्दू, मराठी, हिंदी, उडिया, बंगाली आदी १४ भारतीय भाषांतील कथांचे भारतभर फिरून सादरीकरण केले जाते. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी पैशांची मागणी केली जात नाही. आयोजकांना प्रवास खर्च देणे शक्य नसेल, तर तोही गुलरेज स्वत:च्या खिशातून करतात. जमील यांच्या पत्नी रेखा राव यासुद्धा या उपक्रमात तितक्याच उत्साहाने सक्रिय सहभाग घेत आहेत. आपल्यासारखेच भाषांचे आणखी ध्येयवेडे प्रचारक तयार करण्याचे या दाम्पत्याचे ध्येय आहे. त्यासाठीच दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी मुंबईतील त्यांच्या घरी साहित्य वाचनाची बैठक घेतली जाते. त्यात विविध भाषांमधील सकस साहित्यकृतींचे तरुणांकडून अभिवाचन करून घेण्यात येते. त्यातील काही तरुणांना कथाकथनच्या व्यासपीठावर संधी देण्यात येते. यातून तयार झालेले तरुण मग स्वत:चे मार्गक्रमण सुरू करतात.तरुण पिढीत उत्साहगेल्या दोन वर्षांत असे १५ ते २० अभिवाचक त्यांनी तयार केले आहेत. कथाकथनच्या दिल्लीतील चमूकडूनही अशीच बैठक घेण्यात येते. भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी अधिकाधिक युवकांनी पुढे यावे, अशी इच्छा गुलरेज यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

टॅग्स :मुंबईसाहित्य