Join us

शाश्वत पर्यटनासाठी भारतात प्रयत्न आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 5:46 PM

भारत आणि जगभरामध्ये सध्याच्या काळामध्ये शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे मत अमेरिकास्थित ग्लोबल सस्टेनेबल टुरिझम कौन्सीलच्या (जीएसटीसी) संचालिका कॅथलिन पेसोलानो यांनी व्यक्त केले.

मुंबई - भारत आणि जगभरामध्ये सध्याच्या काळामध्ये शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे मत अमेरिकास्थित ग्लोबल सस्टेनेबल टुरिझम कौन्सीलच्या (जीएसटीसी) संचालिका कॅथलिन पेसोलानो यांनी व्यक्त केले. भारतातील विविध पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर कॅथलिन पेसोलानो यांनी मुंबईत भारतभेटीबद्दल आपले अनुभव व्यक्त केले.

सध्या पर्यटन हा उद्योग जगभरात वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. मात्र पर्यटनस्थळांचा पर्यटकांना सामावून घेण्याचा आवाका, तेथील व्यवस्था, व्यवस्थेवर येणारा ताण वेगवेगळा असतो. या सर्व घटकांचा विचार पर्यटनवृद्धीच्या वेळेस केला गेला पाहिजे. जीएसटीसी सर्व देशातील विविध पर्यटनासाठी आपल्या सूचना आणि बदलांसाठी मार्गदर्शन करत असते. कॅथलिन यांनी भारतामध्ये चेन्नई, पाँडेचेरी, शिलाँग आणि मुंबई येथे पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. तसेच पर्यटनासंबंधित अधिकारी, कंपन्या आणि संस्थांशीही त्यांनी चर्चा केली.

या चर्चेमध्ये त्यांना भारतीय लोकांशी आदानप्रदान करता आले. शाश्वत पर्यटनासाठी काही ठिकाणी आधीपासूनच काम सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. उदाहरणार्थ शिलाँगमधील एका खेड्यामध्ये देवराईचे रक्षण तेथील रहिवासीच करतात. या रहिवाशांनीच धार्मिक कारणांसाठी काही देवराई रक्षणासाठी नियम केले आहेत. त्यांच्याकडून जंगलाचे रक्षणही केले जाते. कॅथलिन यांच्यामते अशा नियमांचा आदर केला पाहिजे. या लोकांनी आपल्या पातळीवर शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामूळे शाश्वत पर्यटनाचे नियम परिस्थितीनुसार, जागेनुसार बदलू शकतात. शाश्वत पर्यटन 100 टक्के शक्य नसले तरी पर्यावरणाचा, जागतिक वारसास्थळांचे कमीत कमी नुकसान होईल व पर्यटनाचा आनंदही घेता येईल अशा पद्धतीने प्रयत्न करणे आपल्या हातामध्ये आहे असे कॅथलिन म्हणाल्या.  

टॅग्स :मुंबईपर्यटन