मुंबई : तब्बल २० महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रतीक्षेत असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ७ जुलैच्या पगारात सुधारित वेतनवाढ मिळणार आहे. वेतनवाढीवर शासनाचे शिक्कामोर्तब झाल्याने जुलैपासून कर्मचा-यांना सुधारित पगार देण्याचे आदेश एसटीच्या कामगार विभागाने दिले. तथापि, मान्यताप्राप्त संघटनेचा या वेतनवाढीला विरोध कायम असून सोमवारी होणा-या बैठकीत पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांसाठी २०१६-२०२० या कालावधीसाठी ४ हजार ८४९ कोटींचा वेतन करार ५ जून रोजी घोषित केला. परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी घोषित केलेली वेतनवाढ फसवी असल्याचे सांगत कामगारांनी अघोषित संप पुकारला होता. महामंडळ आणि संघटना यांच्यातील वेतनाच्या मुद्द्यावरून तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र जुलैपासून महामंडळातील १ लाख ५ हजार कर्मचाºयांना पगारवाढ मिळणार असल्याने महामंडळाने संघटनांना ‘कात्रजचा घाट’ दाखवल्याची चर्चा एसटी अधिकाºयांमध्ये रंगत आहे.सुधारित वेतनवाढीनंतर कनिष्ठ कर्मचाºयांचे वेतन त्यांच्या ज्येष्ठ कर्मचाºयांपेक्षा अधिक होणार नाही, या अटीस अधीन राहून वेतनवाढ देण्यात यावी, असे महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. महामंडळातील वाहक पदावरील कर्मचाºयांना सुधारित वेतनश्रेणीनुसार ११ हजार १८०-२४ हजार ६८५ अशी पगारवाढ मिळेल, तर चालकांची १२ हजार ८०-२६ हजार ६७३ अशी पगारवाढ असेल. सफाई कर्मचारी पदांवरील कर्मचाºयांना सुधारित वेतनश्रेणीनुसार ९ हजार ४१० ते २० हजार ७७८ अशी वेतनवाढ मिळेल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.५३३ कोटी गहाळ?२०१६-२०२० काळातील ऐतिहासिक वेतनवाढ ४ हजार ८४८ कोटींची आहे. यानुसार प्रतिवर्षी १ हजार २१२ प्रमाणे २०१६-२०१८ या काळातील वेतनवाढीचा फरक २ हजार ४२४ इतका येतो. मात्र महामंडळाने घोषित केलेल्या वेतनवाढीत एसटी महामंडळाने केवळ १ हजार १९७ कोटी रुपये ४८ समान हफ्त्यांत अदा करण्यात येतील, असे स्पष्ट केले. परिणामी ५३३ कोटींचे काय झाले, असा प्रश्न कर्मचाºयांकडून विचारला जात आहे.
एसटी महामंडळाकडून संघटनांना ‘कात्रजचा घाट’, ७ जुलैला मिळणार सुधारित वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 1:02 AM