असीम गुप्ता यांच्याकडील ‘कौशल्य विकास’ काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 01:31 AM2019-07-04T01:31:31+5:302019-07-04T01:31:46+5:30
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असलेले गुप्ता यांच्याकडे कौशल्य विकास विभागाचाही कार्यभार होता. तो काढून आज सौनिक यांना देण्यात आला.
मुंबई : कौशल्य विकास विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे १०० कोटींच्या घोटाळ््याची चौकशी दाबून ठेवल्याचे वृत्त लोकमतने दिल्यानंतर आणि या घोटाळ््याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीची घोषणा झाल्यानंतर आता विभागात साफसफाई सुरू करण्यात आली आहे.
या विभागाची सूत्रे असीमकुमार गुप्ता यांच्याकडून काढून ती बुधवारी अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे देण्यात आली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असलेले गुप्ता यांच्याकडे कौशल्य विकास विभागाचाही कार्यभार होता. तो काढून आज सौनिक यांना देण्यात आला. संचालनालयातील १०० कोटींच्या घोटाळ््याची चौकशी दाबून ठेवल्याचा आरोप गुप्ता यांच्यावर मंगळवारी विधान परिषदेतील सदस्यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान केला होता.
या संचालनालयाचे तत्कालीन संचालक आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी विजयकुमार गौतम यांच्या कार्यकाळात झालेल्या शंभर कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण सध्या लोकमतने लावून धरले आहे. याप्रकरणी एसीबी चौकशीची घोषणा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली होती.
गौतम यांच्याबरोबरच संचालनालयाचे विद्यमान प्रभारी संचालक अनिल जाधव हेही याच घोटाळ््यात चौकशीच्या रडारवर आहेत. कारण घोटाळा झाला तेव्हा ते सहसंचालक व सदस्य सचिव होते. याशिवाय विद्यार्थी प्रवेशाचे आॅनलाइन शुल्क मनमानी वाढवण्याचा ठपका असलेले योगेश पाटील यांचीही चौकशी होणार आहे. जाधव आणि पाटील यांच्या निलंबनाचा आदेश कधी निघणार याबाबत उत्सुकता आहे.