लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशभरातील १० हजार लोको इंजिनमध्ये कवच प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यात मध्य रेल्वेच्या ताफ्यातील ७८६ इंजिनांचाही समावेश असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
भारतीय रेल्वेच्या ताफ्यात सध्या २० हजार लोको इंजिन आहेत. त्यांपैकी १५ हजार इलेक्ट्रिक, तर पाच हजार डिझेल इंजिन आहेत. रेल्वे मंत्रालयाला अलीकडेच १० हजार इंजिनांवर कवच प्रणाली बसविण्याच्याा सूचना रेल्वेमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मध्य रेल्वे ७८६ इंजिनांवर रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) स्कॅनर, ड्रायव्हर डिस्प्ले युनिट, अखंड संवादासाठी अँटेना अशी प्रगत उपकरणे लावणार आहे.
मध्य रेल्वे हे काम लवकरच सुरू करणार असून, ते दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्याकरिता चार ते पाच वेल्डिंग टीमची मदत घेणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कवच प्रणालीचे फायदे असे...
लोको पायलट मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यास कवच प्रणाली कार्यरत होऊन रेल्वेगाडीतील ब्रेक यंत्रणा सक्रिय होते आणि तत्काळ गाडी थांबते. यामुळे समोरासमोर येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या गाड्यांची टक्कर टाळता येणे शक्य होणार आहे.
रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर थेट निरीक्षण ठेवणे, रेल्वे फाटकाजवळून जाताना स्वयंचलित शिटी वाजणे, आपत्कालीन परिस्थितीत संदेश देणे, लाल सिग्नल ओलांडण्यापासून रोखण्याचे काम ही कवच यंत्रणा करते. रेल्वेमार्गावर, रेल्वे इंजिन, रूळ आणि सिग्नलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येते.