मुंबई : देशी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘पासबान-ए-अदब’ या संस्थेच्यावतीने येत्या २५ डिसेंबरला काव्यांजली हे मराठी काव्य संमेलन आणि हिंदी शेरो-शायरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरळीतील नेहरु सेंटर येथे दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी अशोक नायगांवकर, अश्विनी शेंडे, गायत्री सप्रे आदीसह देशातील पहिला कविताचा देशातील पहिला बॅँड ‘द इंक बॅँड’चे इर्शाद कामिल हेआपली कला सादर करणार आहेत.
महान शायर व कवी मिर्झा गालिब यांच्या १५० व्या स्मृतिदिनानिमित्य ‘पासबान-ए-आदब’च्यावतीने कला साहित्य व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आले असून त्यामध्ये दिग्गजाबरोबरच नवोदित कलाकारांनाही संधी देण्यात आली असल्याचे या संस्थेचे अध्यक्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असून नाताळच्या दिवशी काव्यांजलीनंतर दोन सत्रामध्ये गजल व शायरीची मैफील रंगणार आहे. जेष्ठ हास्य कवी अशोक नायगांवकर, अश्विनी शेंडे, गायत्री सप्रे, गुरु ठाकूर, किशोर कदम, समीर सामंत, श्रीपाद जोशी, वैभव जोशी, रविंद्र लखे, दिगंबर महाले. नीरजा आपटे आदी आपल्या कविता व कला सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील, त्यानंतर गझल व शायरीचा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये इर्शाद कामिल यांच्यासह प्रसिद्ध गायक संगीतकार तौसिफ अख्तर यांच्याकडून मिर्झा गालिब यांच्या गाजलेल्या गजल, शायरीचे संगीतमय सादरीकरण केले जाणार आहे.
नव्या पिढीमध्ये देशी भाषा आणि राष्ट्रीय एकात्मता दृढ आणि त्याबाबत जागृती करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद यांनी दहा वर्षापूर्वी पासबान-ए-आदब या संस्थेची स्थापना केली आहे. त्याच्याकडून देशभरातील मराठी, हिंंदी, उर्दू भाषेतील लेखक, कवी, साहित्यिक,संगीतकार यांना एकत्र आणून संवाद घडविला जातो. दहा वर्षात मुंबई, नवी मुंबई, पुणे, दिल्ली, लखनौ, रायबरेलीसह विविध महानगर व शहरामध्ये ५० हून अधिक कार्यक्रमाचे घेण्यात आले आहे. त्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते, असे संस्थेचे सचिव दानिश शेख यांनी सांगितले.